नव्या वर्षांच्या अर्थसंकल्पात कर वजावटीची जोड लाभलेल्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे टाकावेत का? तेजीच्या बाजारात समभाग खरेदी करताना काय पहावे? बँक ठेवींपेक्षा म्युच्युअल फंड अधिक आकर्षक परतावा देऊ शकतो काय? या तुमच्या शंकांचे निरसन मंगळवार, ३१ मार्च २०१५ रोजी ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’च्या व्यासपीठावर होणार आहे.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत व ‘नातू परांजपे – इशान ड्रिम बिल्ड प्रा. लि.’ आणि ‘कोटक म्युच्युअल फंड’ सह प्रायोजक असलेल्या व ‘एनकेजीएसबी सहकारी बँके’चे सहकार्य लाभलेला गुंतवणूकविषयक मार्गदर्शनाचा विनामूल्य कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे होत आहे.
गुंतवणुकीचा माहिती मार्ग असलेल्या ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ विशेषांकाच्या प्रकाशनाद्वारे गेल्याच आठवडय़ात ठाण्यातून गुंतवणूक जागरणाची सुरुवात झाली. याच मालिकेतील या दुसऱ्या कार्यक्रमात कोटक म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह, बाजार विश्लेषक अजय वाळिंबे व करविषयक तज्ज्ञ चंद्रशेखर वझे हे मार्गदर्शन करतील.
त्याचबरोबरच गुंतवणुकीविषयी सचित्र माहिती देणारा ‘अर्थब्रह्म’ हा विशेषांक यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असेल. याच कार्यक्रमात ‘लोकसत्ता’च्या वाचकांना उपस्थित पाहुण्यांकडून गुंतवणुकीविषयक शंका निरसन करून घेता येईल.
* म्युच्युअल फंड गुंतवणूकविषयक प्रसिद्ध भाष्यकार निलेश शाह हे फंड क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत माहितीबरोबरच फंडातील परतावा, फंडांची निवड, क्षेत्रनिहाय फंड आदींबाबत सहज सोप्या शब्दात विवेचन करतील.
* अजय वाळिंबे हे ‘अर्थ वृत्तान्त’च्या माध्यमातून ‘लोकसत्ता’च्या वाचकांना परिचित आहेतच. ‘पोर्टफोलियो’ या सदराद्वारे त्यांनी सुचविलेल्या समभागांचा चढता मूल्य प्रवास आपण पाहतोच. याही कार्यक्रमाच्या निमित्ताने समभाग खरेदी – विक्री करताना एक गुंतवणूकदार म्हणून काय पाहणे आवश्यक आहे, हे ते समजावून सांगतील.
* चंद्रशेखर वझे हे सहकारी बँक क्षेत्राबरोबर महाराष्ट्राच्या कर क्षेत्रातही नावाजलेले नाव आहे. वझे हे या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बुधवार, १ एप्रिलपासूनच सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षांपासून बदल होत असलेल्या कर रचनांवर प्रकाश टाकतील. त्याचबरोबर यंदा खुल्या करण्यात आलेल्या प्राप्तीकर सवलतीच्या बहुविध पर्यायांचाही ते परामर्श घेतील.
* कधी: मंगळवार, ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता
* कुठे : रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी
* प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arth bramha
First published on: 31-03-2015 at 06:18 IST