‘यशस्वी भव’च्या ‘शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शन’ कार्यशाळेतील सूर
विद्यार्थी आमच्यापर्यंत येत नाहीत.. मुले वर्गात बोलत नाहीत.. यासारख्या सर्व समस्यांवर ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून राबविण्यात येणारा ‘यशस्वी भव’ हा उपक्रम व पुस्तिका फायदेशीर ठरेल, असा विश्वास दहावीच्या शिक्षकांनी व्यक्त केला. निमित्त होते सहपालकत्वाच्या भूमिकेतून ‘लोकसत्ता’ व कळवण एकात्मिक विकास प्रकल्प यांच्या वतीने दहावीच्या शिक्षकांसाठी रविवारी आयोजित ‘शिक्षक प्रशिक्षण मार्गदर्शन’ कार्यशाळेचे.
कळवण तालुक्यातील नाकोडा येथे आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर इंग्रजी, विज्ञान तंत्रज्ञान व गणित या विषयांच्या प्रकल्पातील शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ वितरण महाव्यवस्थापक मंगेश ठाकूर, ‘यशस्वी भव’ उपक्रमाचे समन्वयक सी. डी. वडके, प्रकल्पाचे शिक्षणविस्तार अधिकारी जी. एस. खंडेलवाल, केंद्रप्रमुख एस. के. पगार, साहाय्यक प्रकल्पाधिकारी डी. आर. केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी व पालकांची गोंधळलेली मानसिकता लक्षात घेता सहपालकत्वाच्या भूमिकेतून ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘यशस्वी भव’ हा उपक्रम राबविला जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून या उपक्रमावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात झालेल्या बदलाविषयी पालक व विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. त्यांच्यापर्यंत हे बदल पोहोचताना त्यांचा गोंधळ उडू नये यासाठी ‘लोकसत्ता’ने यशस्वी भव या स्वतंत्र पुस्तिकेची निर्मिती केल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. प्रकल्प अधिकारी केंद्रे यांनी आपण प्रकल्प कार्यालयातील शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात येणाऱ्या अडचणींविषयी मार्गदर्शन करण्याचा आग्रह ‘लोकसत्ता’कडे धरला होता, असे सांगत आता यशस्वी भव या उपक्रमाचा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल, याबाबत शिक्षकांनी विचार करावा, असे आवाहन केले.
उद्घाटन सत्रानंतर मुंबई येथील इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांचे शिक्षक विलास परब, अखिल भोसले आणि विवेक पुराणिक यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. उपस्थित शिक्षकांनी शिकवताना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थी व पालकांची मानसिकता याबद्दल समस्या मांडल्या. गणिताचे शिक्षक पुराणिक यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले.
 गणिताचा अभ्यासक्रम हा पूर्णत: मूलभूत संकल्पना आणि त्या संकल्पनेचा व्यावहारिक जगतात होणारा वापर यावर आधारलेला आहे. गणिताची भाषा क्लिष्ट असून संवादात्मक नाही. यासाठी वर्गात विद्यार्थ्यांसमवेत चर्चेवर भर देण्याची सूचना त्यांनी केली. परब यांनी विज्ञानातील गमतीजमती विद्यार्थ्यांना आपल्या प्रमाणभाषेत सांगण्याची सूचना केली.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भाषेची अडचण होत असली तरी प्रात्यक्षिके, पर्यायी शैक्षणिक साधनांचा वापर यांचा उपयोग करीत आपण मुलांसमोर ती संकल्पना प्रत्यक्ष मांडू शकतो. रासायनिक संज्ञांसाठी काही लघू शब्द (जसे ‘बोसक्या’, लिनिका आदी) वापरावेत, असे त्यांनी नमूद केले.भोसले यांनी इंग्रजी शिकविताना पारंपरिक म्हणजे निव्वळ भाषांतर ही पद्धती न वापरता थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांशी सोप्या पद्धतीने कसा संवाद साधावा, शिकविताना पर्यायी साधने कशी निर्माण करावीत, हे समजण्यास मदत झाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
 ‘लोकसत्ता’ची ‘यशस्वी भव’ ही पुस्तिका केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही उपयुक्त ठरू शकते, अशी प्रतिक्रियाही बहुतेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाशिक लोकसत्ता कार्यालयाचे वितरण व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta co guardianship is important
First published on: 26-06-2013 at 08:00 IST