एकीकडे मुंबई महापालिकेने लागू केलेल्या नव्या कररचनेमुळे मुंबईकरांचे कंबरडे पुरते मोडणार असताना त्यांना नागरी सुविधा देण्यात महापालिका अपुरी पडत आहे. हजारो कोटी रुपये खर्चून चांगले रस्ते निर्माण होत नाहीत तसेच अनेक भागात पाण्याची बोंब आहे. या पाश्र्वभूमीवर किमान फेरीवाल्यांचे तसेच अनधिकृत बांधकामांचे वाढते अतिक्रमण रोखण्याचे आव्हान महापालिका पेलेल ही अपेक्षाही फोल ठरली आहे. रेल्वे स्थानकांपासून मुंबईतील सर्व पदपथ फेरीवाल्यांनी हडप केले असून दिसेल तिथे मोकळ्या जागांवर अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहत असताना पालिकेचे अधिकारी मात्र हतबल असल्याचे चित्र दिसते.
तत्कालीन आयुक्त जॉनी जोसेफ व करूण श्रीवास्तव यांच्या काळात महापालिका, राज्य शासन तसेच म्हाडाच्या जमिनींवरील सुमारे ९० हजार अनधिकृत झोपडय़ा तोडण्यात आल्या होत्या. तसेच पदपथावरील धार्मिक स्थळे न्यायालयाच्या आदेशानुसार काढण्यात आली होती. त्यानंतर आता यातील बहुतेक ठिकाणी पुन्हा धर्मिक स्थळे उभी राहिली असून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे ज्या पालिका मुख्यालयात बसतात तेथून हाकेच्या अंतरावरील छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारा भुयारी मार्ग आज अनधिकृत फेरीवाल्यांची मक्तेदारी बनला आहे.
कुंटे यांनी अनधिकृत बांधकामांची दखल घेऊन राज्य शासनाकडे अतिक्रमण काढण्यासाठी १०६४ पोलीस व तीन पोलीस ठाण्यांची मागणी केली आहे. विधिमंडळात प्रत्येक अधिवेशनात सहाय्यक पालिका आयुक्त व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री करत असतात. तर गृहमंत्री आर. आर. पाटील पोलीस संरक्षण देण्याच्या बाता मारतात. मात्र प्रत्यक्षात पुरेस पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे कारवाई करता येत नाही, असे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळेच गोवंडी, बेहरामपाडा, गरीबनगरपासून मालाडच्या कुरार व्हिलेजसह बोरिवलीच्या गणपत पाटील नगरमध्ये अनधिकृत झोपडय़ांचे टॉवर उभे राहिलेले दिसतात. पश्चिम रेल्वेमधून जाताना वांद्रे व माहीम स्थानकाबाहेर पाचपाच मजल्यांच्या झोपडय़ा उभ्या राहिलेल्या नागरिकांना दिसतात.  पालिकेला मात्र ते कसे दिसत नाही हा एक प्रश्नच आहे.
पालिकेतील शिवसेनेच्या एका महिला नगरसेविकेने जी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्तांकडे वरळीतील अनधिकृत झोपडय़ांबाबत तक्रार केली असता सदर जागा कलेक्टरची असल्यामुळे तुम्ही कलेक्टरकडे तक्रार करा असा ‘सल्ला’ देण्यात आला. वांद्रे येथील मनसेचे विभाग अध्यक्ष तुशार आफळे यांनी वांद्रे येथील ३५० अनधिकृत झोपडय़ांवर कारवाई सुरू केल्यानंतर पालिका व पोलिसांनी त्याची दखल घेतली. भाजप आमदार गोपाळ शेट्टी यांनी तर गेली काही अधिवेशने सातत्याने गणपत पाटील नगरमधील अतिक्रमणांविरोधात आवाज उठवल्यानंतर थोडीफार कारवाई झाली. मात्र मुंबईतील खारफुटीची जागा तसेच मिठागराच्या जागेवरही आज सर्रास अतिक्रमण सुरू असताना पालिका अधिकारी मात्र थंड बसून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots of illigal constructions but corporation is neglecting it
First published on: 04-01-2013 at 12:19 IST