नवी मुंबई पालिकेने नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिलेल्या एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांजवळील पावसाळी नाल्यांची मान्सूनकालीन साफसफाई न केल्याने संततधार पावसात हे रस्ते जलमय झाले असून रस्त्यावर नद्या अवतरल्याचे दृश्य आहे. एमआयडीसी क्षेत्रातील या दुरवस्थेबरोबरच शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून पावसाळ्यापूर्वी बनवलेले नवीन रस्तेही वाहून गेले असल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई औद्योगिक पट्टय़ातील सर्व रस्ते २००५ नंतर विकासासाठी पालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांची एमआयडीसीने डागडुजी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सुमारे १३५ किलोमीटर अंतराचे रस्ते एमआयडीसीने पालिकेला हस्तांतरित केले आहेत. नवी मुंबई पालिकेने गेली १९ वर्षे एमआयडीसी क्षेत्राला सापत्नभावाची वागणूक दिल्याचा आरोप उद्योजक नेहमीच करीत आहेत. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर एमआयडीसी क्षेत्राला सुविधा देण्याचे पालिकेने आश्वासन दिले आहे. तरीही या क्षेत्रातील रस्ते अद्याप शरपंजरी पडले असून रस्त्यावर तळी तयार झाली आहेत. महापे-शीळ फाटा मार्गावर तर अनेक ठिकाणी रस्त्यांच्या जवळील पावसाळी नाले पावसाळ्यापूर्वी साफ न केल्याने त्या नाल्यांचे सर्व पाणी रस्त्यांवरुन वाहत असल्याचे दृश्य आहे. या पाण्यात गाडी टाकण्याचे धारिष्टय़ वाहनचालाकांना होत नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी होत आहे. पालिकेने पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्ते चकाचक करण्याच्या दृष्टीने फाइजर ते महापे आणि महापे ते मुंकंद कंपनीपर्यंतच्या रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रिटीकरण हाती घेतले आहे. त्याची कामे सध्या काही ठिकाणी सुरू आहेत. या कामांमुळेदेखील जवळच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. क्राँक्रिटीकरणाचे रस्ते वगळता एमआयडीसीत सुमारे १०० किलोमीटरचे अंर्तगत रस्ते आहेत. त्यांची दुरवस्था कोणत्याही औद्यगिक पट्टय़ाला शोभणारी नाही. पालिका क्षेत्रात २५२ किलोमीटरचे अंतर्गत रस्ते आहेत तर ४८ किलोमीटरचे मुख्य रस्ते आहेत. मुख्य रस्ते पालिकेने क्राँक्रिटीकरण केल्याने ठीकठाक आहेत, पण अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यात पावसाळ्यापूर्वी मल व पाण्याच्या वाहिन्या टाकणाऱ्या कंत्राटदारांनी हे रस्ते पूर्ववत करताना मलमपट्टी लावल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पालिका एमआयडीसीतील मुख्य रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करीत असून त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पावसाची उघडीप मिळाल्यानंतर हाती घेतले जाईल असे पालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेरुळ सेक्टर २० ते सारसोळे डेपो, वाशीतील सेक्टर १६ क्षेत्र, ऐरोली सेक्टर आठ क्षेत्रमध्ये खड्डय़ाचे साम्राज्य पसरले असून कोपरखैरणे, घणसोली या क्षेत्रांतील रस्त्यांची अवस्था काही वेगळी नाही. ऐरोली सेक्टर आठमधील सेंट झेवियर्स शाळा ते डी मार्टपर्यंतच्या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे, पण हा रस्ता सध्या वाहून गेला असून त्याची खडी बाहेर आली आहे. सेक्टर आठच्या चौकात खड्डय़ांनी वर्तुळ तयार केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots of problem for travel in navi mumbai
First published on: 12-07-2013 at 09:45 IST