कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर आयआरबी कंपनीकडून आकारणी केल्या जाणाऱ्या टोलविरोधात गतवर्षी ९ जानेवारीला काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय महामोर्चाची वर्षपूर्ती होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी जिल्हय़ातील खासदार, आमदार, सर्वपक्षीय नेते, नागरिक, विद्यार्थी यांचे शिरोली टोलनाका येथे धरणे आंदोलन होणार आहे. या वेळी आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर केला जाणार आहे. हा निर्णय सोमवारी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
टोल आकारणीबाबत नागरिकांत संतप्त भावना असल्याने कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील या जिल्हय़ातील दोन्ही मंत्र्यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत खासदार मंडलिक यांनी राज्य शासनाचा कोल्हापूरकडे पाहण्याच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. कोल्हापूर शहरामध्ये बिओटी तत्त्वावर आयआरबी कंपनीकडून रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. सुमारे २२० कोटी रुपयांचा खर्च या योजनेसाठी अपेक्षित होता. तथापि या रस्त्यांच्या कामांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी, गंभीर दोष उद्भवलेले आहेत. परिणामी, अनेक अपघात होऊन काहीजणांना जीवही गमवावा लागला आहे. रस्त्यांचे काम निकृष्ट असताना भरमसाट टोल आकारणी करण्याचा प्रयत्न आयआरबी व राज्य शासनाच्या वतीने सुरू आहे. त्याला सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने विरोध केला जात आहे. त्यासाठी गतवर्षी ९ जानेवारी रोजी शहरामध्ये महामोर्चाचे आयोजन केले होते. त्यामध्ये टोल आकारणीला शहरातील नागरिकांचा असलेला विरोध प्रकर्षांने दिसून आला होता. यानंतरही वर्षभरानंतर सातत्याने वेगवेगळय़ा प्रकारे आंदोलने झाली आहेत. अलीकडेच हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर नागपूर येथे कोल्हापुरात टोल आकारणीच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू होत्या. तर गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी टोल आकारणीसंदर्भात विचारणा करण्यात आली होती. तेव्हाही त्यांनी त्याबाबतची भूमिका स्पष्टपणे मांडलेली नव्हती. या घडामोडी पाहता शासनाकडून टोल आकारणी होणार असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टोलविरोधी कृती लढा नव्याने लढता जात आहे. यासंदर्भात सोमवारी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निवासस्थानी टोलविरोधी कृती समितीची बैठक घेत खासदार मंडलिक, ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील, कॉ.गोविंद पानसरे, निमंत्रक निवास साळोखे, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, कॉ. दिलीप पोवार, अॅड. पंडितराव सडोलीकर यांच्यासह विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीत बुधवारी (९ जानेवारी) शिरोली टोलनाका येथे सकाळी १० ते १२ अशा दोन तासांचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनावेळी लढय़ाची पुढील दिशा घोषित केली जाणार आहे. बैठकीवेळी बोलताना खासदार मंडलिक यांनी टोल आकारणीच्या जनलढय़ाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. टोल आकारणी रद्द होण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी भेट घेऊन चर्चा केली. मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही. शासनाची भूमिका अस्पष्ट स्वरूपाची आहे. कोल्हापूर जिल्हय़ावर शासनाकडून सातत्याने अन्याय केला जातो. टोल आकारणीतही हीच भूमिका दिसत आहे. सामान्य जनतेचा टोल आकारणीस प्रखर विरोध असताना हसन मुश्रीफ व सतेज पाटील या जिहय़ातील दोन्ही मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. सांगलीमध्ये शासनाकडून एखादी अन्यायकारक भूमिका घेतली गेली तर तेथील मंत्री संघटित होऊन त्यास विरोध करतात, हेच चित्र कोल्हापुरातील मंत्र्यांकडून दिसण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
९ जानेवारीला होणाऱ्या धरणे आंदोलनास खासदार मंडलिक, खासदार राजू शेट्टी, प्रा.एन.डी.पाटील, गोविंद पानसरे, आमदार महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, युवा नेते धनंजय महाडिक यांच्यासह सर्व पक्षांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2013 रोजी प्रकाशित
टोलआकारणीविरोधात ९ जानेवारीला कोल्हापुरात महामोर्चा
कोल्हापूर शहरातील रस्त्यांवर आयआरबी कंपनीकडून आकारणी केल्या जाणाऱ्या टोलविरोधात गतवर्षी ९ जानेवारीला काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय महामोर्चाची वर्षपूर्ती होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी जिल्हय़ातील खासदार, आमदार, सर्वपक्षीय नेते, नागरिक, विद्यार्थी यांचे शिरोली टोलनाका येथे धरणे आंदोलन होणार आहे.
First published on: 07-01-2013 at 07:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha morcha against toll tax from 9 jan in kolhapur