महसूलसारख्या अतिशय जबाबदारीच्या विभागात काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा तणावाचा सामना करावा लागतो. कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी व ती सातत्याने वृद्धिंगत करण्यासाठी खेळ आवश्यक आहेत. खेळातही गुणवत्तेसोबतच खिलाडूवृत्ती जोपासावी, असे मत विभागीय आयुक्त बी.व्ही.गोपाल रेड्डी यांनी व्यक्त केले.
 ऊर्जानगरात आयोजित विभागीय महसूल क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विजय वाघमारे होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे, महापालिका आयुक्त प्रकाश बोखड, वीज केंद्राचे महाव्यवस्थापक गोहोत्रे, महसूल उपायुक्त डी.एस. चिलमुलवार, उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सी. एस. डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार उपस्थित होते. क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व ध्वजारोहण करून विभागीय आयुक्त रेड्डी यांनी स्पर्धाचे उद्घाटन केले.
कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्याचा नंतर कामावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. कार्यक्षमता वाढल्यास नागरिकांना चांगल्या सेवा पुरविता येतील. कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे महसूल विभाग लोकाभिमुख होण्यास मदतच होईल, असेही रेड्डी म्हणाले. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या खेळाचा उपयोग कार्यक्षमता वाढविण्यासाठी करावा, खेळभावना केवळ मैदानापुरतीच न ठेवता ती  दैनंदिन आचरणात आणावी, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी केले. प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर यांनी केले. स्पध्रेत ७२ प्रकारच्या खेळांचा समावेश असून त्यात सातशे खेळाडू  सहभागी आहेत. खेळासोबतच विविध सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी आभार उपविभागीय अधिकारी एम.ए. राऊत यांनी मानले.
याप्रसंगी सर्व जिल्हय़ाच्या खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. खेळाडूंना नायब तहसीलदार अरविंद सेलोकर यांनी शपथ दिली. या स्पध्रेचा उद्घाटनपर व्हॉॅलीबॉल सामना गडचिरोली व गोंदिया संघादरम्यान झाला.