बेकायदेशीरपणे आणलेले पिस्तूल एक तरुण आपल्या मावसभावाला दाखवत असताना त्यातून चुकून गोळी सुटल्याने भावाचा मृत्यू झाला. राजगुरुनगर तालुक्यातील निमगाव खंडोबा येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी खेड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
किशोर दिलीप शिंदे (वय २३) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्याचा मावसभाऊ राहुल संजय पवार (वय २६ ) व त्याचा मित्र सुधीर वासुदेव दुधाणे (वय २०, रा. दोघेही- म्हाळुंगे-इंगळे, ता. राजगुरुरूनगर) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव-दावडी रस्त्यावर शिवमल्हार ढाब्यावर किशोर, राहुल, संजय व इतर मित्र जेवण्यासाठी गेले होते. यावेळी राहुल याने आपल्यासोबत एक पिस्तूल आणले होते. तो सर्वाना ते दाखवित होता. या पिस्तुलात गोळ्या असलेली मॅग्झिन त्याने बाजूला काढून ठेवलेली होती. मॅग्झिन काढले तरी एक गोळी पिस्तुलात राहते याची माहिती राहुलला नव्हती. पिस्तुल दाखवत असताना त्याने चाप ओढला असता त्यामधे राहिलेली एक गोळी सुटून ती किशोरच्या डोक्यात घुसली. जखमी अवस्थेत किशोरला त्यांनीच राजगुरुनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी चाकणला घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेऊन खेड पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय मगर, उपविभागीय पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत पाटील म्हणाले की, आरोपीने घटनेनंतर पिस्तूल लपवून ठेवले होते. ते जप्त करण्यात आले आहे. हे पिस्तूल सापडल्याचे आरोपी सांगत असला तरी त्याने हे कोणाकडून तरी विकत घेतले असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमर देसाई हे अधिक तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Feb 2013 रोजी प्रकाशित
पिस्तूल दाखवत असताना गोळी सुटून तरुणाचा मृत्यू
बेकायदेशीरपणे आणलेले पिस्तूल एक तरुण आपल्या मावसभावाला दाखवत असताना त्यातून चुकून गोळी सुटल्याने भावाचा मृत्यू झाला. राजगुरुनगर तालुक्यातील निमगाव खंडोबा येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी खेड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
First published on: 05-02-2013 at 02:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man died in gunfired