मुंबईत नालेसफाईची ६० टक्के कामे झाल्याची टिमकी प्रशासनाने वाजविताच महापौर पत्रकारांचा लवाजमा घेऊन नदी-नाल्यांवर धडकले आणि त्यांनी प्रशासनाच्या कामाची तोंडभरून स्तुती केली. मात्र या नालेपाहणीची माहिती नसलेले सर्वपक्षीय नगरसेवक महापौरांवर रुसले. आपल्या प्रभागातील नाला पाहण्यासाठी ‘महापौर आले पण आम्हाला नाही बोलावले’ हा त्यांचा राग आहे. पालिका सभागृहाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांमध्ये युद्धपातळीवर नाले आणि नदी सफाईची कामे करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.
त्यामुळे महापौर सुनील प्रभू यांनी बुधवारी नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते. वरळीच्या लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनपासून सुरू झालेला दौरा पूर्व-पश्चिम उपनगरांतील नाल्याच्या पाहणीनंतर दहिसर, पोईसर नदी किनाऱ्यावर आटोपता घेण्यात आला. प्रत्येक नाल्यावर कंत्राटदाराचे कामगार पाण्यात उतरून सफाई करीत असल्याचे दृष्य पाहून महापौरही सुखावले. यामुळे यंदा मुंबई जलमय न होता मुंबईकरांना पावसाचा आनंद लुटता येईल, असे सांगत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
ज्या भागातील नाला आणि नदीची महापौरांनी पाहणी केली, तेथील स्थानिक नगरसेवकांना मात्र या दौऱ्याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक नगरसेवक हिरमुसले. त्यामध्ये काँग्रेसच्या रिद्धी खुलसुंगे, शीतल म्हात्रे, मनसेच्या शिल्पा चौगले, चेतन कदम, भाजपच्या मनीषा चौधरी आदींचा समावेश आहे.
‘नाले आणि नद्यांतील सफाई योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार आसपासचे नागरिक स्थानिक नगरसेवकांकडे करीत आहेत. असे असताना या दौऱ्याबाबत इतकी गुप्तता का राखण्यात आली’, असा सवाल मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी केला आहे.
काँग्रेस आणि मनसेचे नगरसेवक या गोपनीय दौऱ्यामुळे संतप्त झाले असून या मुद्दय़ावरून सभागृहात रणशिंग फुंकण्याचा विचार उभय पक्ष करीत आहेत. त्यामुळे पालिका सभागृहाच्या बैठकीत रण पेटण्याची चिन्हे आहेत.