एमएमआरडीएने शैक्षणिक उपक्रमासाठी दिलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील १३ एकर भूखंडाचा मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने व्यावसायिक वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एमएमआरडीएने ‘एमसीए’वर नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये तीन महिन्यांत आवश्यक ती पावले उचला, अन्यथा भाडेपट्टा संपुष्टात आणला जाईल; असे एमएमआरडीएने बजावले आहे.
एमएमआरडीएने ५ मार्च २००४ रोजी एमसीएला शैक्षणिक उपक्रमासाठी ५२.१५७ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ८० वर्षांसाठी भाडेपट्टय़ाने दिला होता. त्यासाठी २,६५,९८,२०२ रुपये शुल्क आकारण्यात आले होते. मात्र एमसीएने या भूखंडाचा व्यावसायिक कामासाठी वापर केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एमएमआरडीएने एमसीएवर नोटीस बजावली आहे. माहितीचा अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात याविषयी माहिती मिळविल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला. एमएमआरडीएने हा भूखंड ताब्यात घ्यावा आणि एमसीएवर कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.