रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर मीटर कॅलिब्रेशनसाठी दिलेल्या ४५ दिवसांच्या मुदतीत केवळ इ-मीटरवरच लक्ष केंद्रित करण्यात आल्यामुळे मेकॅनिकल मीटरचा घोळ कायम राहिला आहे. त्यातच जुन्या मेकॅनिकल मीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार वाढू लागल्याने प्रवाशांची चांगलीच लूटमार होत आहे. टॅक्सींनाही इ-मीटर सक्तीचे करण्यात आल्यामुळे शहरातील मेकॅनिकल मीटर असलेल्या जवळपास ८५ टक्के टॅक्सी आणि रिक्षांचे मीटर्स कॅलिब्रेशनअभावी तसेच राहिले आहेत. मुदतीनंतर कारवाई करण्याचे परिवहन विभागाने ठरविले असले तरी प्रत्यक्षात कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.
मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी २४ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून अद्याप शहरातील टॅक्सी आणि रिक्षांचे कॅलिब्रेशन करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच परिवहन विभागाने मॅकॅनिकल मीटरऐवजी इ-मीटरची सक्ती जुन्या टॅक्सींनाही केल्यामुळे प्रथम इ-मीटर लावायची की कॅलिब्रेटेड मीटरसाठी थांबायचे असा प्रश्न उपस्थित करत अनेक टॅक्सीचालकांनी वाट पाहण्याची भूमिका घेतली आहे. परिणामी शहरातील जवळपास ८५ टक्के टॅक्सींचे मीटर कॅलिब्रेशनचे काम अद्याप झालेले नाही. परिवहन विभागाने २४ नोव्हेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देण्याची आणि कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. मॅकॅनिकल मीटरचे कॅलिब्रेशन करण्यात येत नसल्यामुळे अनेक टॅक्सी-रिक्षा चालकांनी आपल्या जुन्या मीटरमध्येच फेरफार करत प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे प्रवासीही रंजीस आले आहेत.
परिवह विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ३६ हजाराहून अधिक रिक्षा तर १७ हजाराहून अधिक टॅक्सींचे कॅलिब्रेशन करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी ५५ हजार रिक्षा आणि १२ हजार टॅक्सींना मॅकॅनिकल मीटर असून त्यांचे कॅलिब्रेशन झालेले नाही. हे कॅलिब्रेशन रविवारपर्यंत म्हणजेच दिलेल्या मुदतीत झाले नाही तर प्रवाशांनाच त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
रिक्षाोणि टॅक्सी युनियनच्या नेत्यांनीही इ-मीटर लावण्याचा आग्रह केला असला तरी प्रत्यक्षात अनेकांनी या आवाहनाकडेही दुर्लक्ष केले आहे. परिवहन विभागाने प्रथम मॅकॅनिकल मीटरच्या कॅलिब्रेशनला प्राधान्य द्यायला हवे, असे ग्राहक पंचायतचे म्हणणे आहे. मात्र त्यासाठी वेगळे केंद्र उघडण्याची गरज नसल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. शेवटच्या क्षणी धावपळ करण्यापेक्षा रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी वेळेतच आपल्या मॅकॅनिकल मीटरचे रूपांतर इ-मीटरमध्ये करून घेतले तर त्यांना कारावाईला सामोरे जावे लागणार नाही, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मीटर कॅलिब्रेशन झाले नसेल तर त्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला नवे भाडे घेता येणार नाही, अशी भूमिका काही दिवसांपूर्वी परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी मांडली होती. प्रवाशांनी त्यांना जुने भाडेच द्यावे असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. असे असले तरी मोठय़ा प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सींचे कॅलिब्रेशन झाले नसल्यामुळे परिवहन विभागाला त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई करणे शक्य होणार नाही.