केंद्रीय अर्थसंकल्पात विदर्भात भारतीय आयुर्विज्ञान रुग्णालय व संशोधन संस्था ( एम्स् ) दर्जाचे हॉस्पिटल तयार करणार असल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेचे नागपुरातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून या प्रकल्पास त्वरित निधी उपलब्ध करून तो पूर्णत्वास न्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.  
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव म्हणाले, विदर्भात यापूर्वीच ‘एम्स्’ तयार व्हायला हवे होते. उशिरा का होईना, केलेल्या घोषणेचे स्वागत आहे. विदर्भात अनेक वैद्यकीय सोयी उपलब्ध नाहीत. एम्स् झाल्याने त्या उपलब्ध होतील. त्यामुळे रुग्णांना विदर्भाच्या बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. विदर्भात मोठी शासकीय रुग्णालये असली तरी योग्य सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सोयी उपलब्ध होत नाही. एम्स्वर केंद्र सरकारचे नियंत्रण राहात असल्याने तेथे सर्वच आजारावरील सेवा उपलब्ध होतील. तसेच विदर्भातील इतर हॉस्पिटलचीही गुणवत्ता वाढेल. विदर्भातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास वाव मिळेल. नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढेल. आता लवकरात लवकर एम्स्च्या निर्मितीकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.   
महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी या घोषणेचे स्वागत करून गेल्या पंचवीस वर्षांंपासूनचे विदर्भाचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगितले. एम्स दर्जाचे हॉस्पिटल विदर्भात नागपुरातच होऊ शकते. नागपूर ही राज्याची उपराजधानी असून ती मध्यभारतात येते. नागपुरात मेडिकल, मेयो व सुपर स्पेशालिटी हे तीनच मोठे शासकीय हॉस्पिटल्स आहेत. सध्या या हॉस्पिटलला काही मर्यादा आहेत. एम्स् दर्जाचे हॉस्पिटल झाल्यास ते विदर्भासाठीच नव्हे तर मध्य भारतासाठी वरदान ठरणार आहे. केलेल्या घोषणेप्रमाणे केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा व हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा. एम्स् दर्जाचे हॉस्पिटल झाल्यास संशोधनाला चालना मिळेल. विदर्भातील डॉक्टरांनाही चांगले दिवस येतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे म्हणाले, विदर्भात एम्स्च्या दर्जाचे हॉस्पिटल होणे आवश्यक होते. हे हॉस्पिटल झाल्यास विदर्भासोबतच मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातील लोकांनाही फायदा होईल. आधीच शासकीय हॉस्पिटलमध्ये योग्य सोयी उपलब्ध नसल्याने नाईलाजाने गरीब व सामान्य नागरिकांना खासगी हॉस्पिटलकडे धाव घ्यावी लागते. खासगी हॉस्पिटलस् ७५ ते ८० टक्के रुग्णांना सेवा उपलब्ध करून देतात. एम्स् झाल्यास खासगी हॉस्पिटलमधील भार कमी होईल. तसेच गुणवत्तेत वाढ होईल, असेही डॉ. देशपांडे यांनी नमूद केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, राज्य शाखेचे उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक यांनी केंद्र शासनाच्या या घोषणेचे स्वागत करून एम्स् झाल्यास विदर्भातील नागरिकांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले. छत्तीसगड राज्यासारख्या लहान राज्यामध्ये एम्स् असताना विदर्भात का नाही, असा प्रश्न पडत होता. यापूर्वीच्या केंद्र सरकारनेही विदर्भात एम्स् तयार करण्याची घोषणा केली होती. परंतु ती हवेतच विरली. किमान या सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे पाऊल उचलावे, अशी अपेक्षाही डॉ. नाईक यांनी व्यक्त केली.
एम्स् तयार झाल्यास विदर्भाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी ठरणार असल्याचे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांनी व्यक्त केले. नागपुरातील मेडिकल, मेयो आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय सोडले तर विदर्भात शासकीय मोठी रुग्णालये फार कमी आहेत. विदर्भात एम्स् तयार झाल्यास विविध विषयातील तज्ज्ञ तयार होतील. विदर्भातील तरुणांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही. विदर्भाला लागून असलेल्या राज्यांनाही त्याचा लाभ होईल, असेही डॉ. पावडे यांनी स्पष्ट केले.