हिंगोली लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात इच्छुक, तसेच संभाव्य उमेदवारांची चर्चा सूर्यकांता पाटील, अॅड. शिवाजीराव जाधव, आमदार राजीव सातव या नावांभोवती फिरत असतानाच आता या चर्चेत किनवटचे आमदार प्रदीप नाईक यांच्या नावाची भर पडली आहे.
या मतदारसंघाच्या अदलाबदलीसंदर्भात दोन्ही काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मधल्या काळात राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची जी यादी आली, त्यात हिंगोलीतून सूर्यकांता पाटलांचे नाव प्रसिद्ध झाले; पण ही जागा अंतिमत: राष्ट्रवादीला सुटलीच, तर सूर्यकांता पाटील यांच्याऐवजी प्रदीप नाईक यांना लोकसभेसाठी मैदानात उतरविले जावे, अशी टुम निघाली आहे. नाईक यांचे नाव काँग्रेसच्या दोन आमदारांसह राष्ट्रवादीच्या एका आमदारानेही उचलून धरले असल्याचे समजते.
हिंगोली लोकसभा क्षेत्रातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादीने माजी आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांची नियुक्ती अलीकडेच केली. स्थानिक राजकारणात सूर्यकांता पाटील व चिखलीकर यांचे सख्य नाही; पण पक्षाच्या नव्या टीमने चिखलीकरांना दौरा करण्यास सांगून अहवाल मागविला आहे. उमरखेड व किनवट मतदारसंघांच्या त्यांच्या दौऱ्यात सूर्यकांता पाटलांबद्दल कल संमिश्र स्वरूपाचा होता. पण नाईक यांचे नाव त्यांच्यासमोर आले नसताना, ते आता अचानक चर्चेत आले. त्यामुळेच संबंधितांत खळबळ उडाली. नाईक २००४ पासून किनवट विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. मतदारसंघावर त्यांचा प्रभाव आहे. सूर्यकांता पाटलांचे समर्थक हीच त्यांची ओळख; पण आतापर्यंत राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव कधीच नव्हते. उलट त्यांनी पक्ष नेत्यांसमोर सूर्यकांताबाईंचे नाव उचलून धरले होते.
आता त्यांचे नाव चर्चेत आल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी थेट संपर्क साधला असता, आपणही तसे ऐकत आहोत, असे सागूंन नव्या राजकीय चर्चेला त्यांनी दुजोराच दिला. पक्षाने आदेश दिला तर लढावेही लागेल, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या उत्तमराव राठोड यांनी १९८० ते १९९१ दरम्यान सलग ३ निवडणुकांत हिंगोली लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९९१ ते १९९६ वगळता या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मराठा समाजाने केले. बंजारा, आदिवासी, हटकर व अन्य उपेक्षित जातींचे या मतदारसंघात मोठे प्राबल्य असल्याचे नाईक यांना उमेदवारी देऊन नवा प्रयोग करण्याचा विचार पुढे आला आहे. प्रसंग आलाच तर अशोक चव्हाण यांची मदत, सहकार्य मिळेल काय, याची चाचपणी नाईक यांनी मुंबईतूनच सुरू केल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla pradeep naik in race nanded
First published on: 26-02-2014 at 01:47 IST