गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राज्यात लोकायुक्त कायदा लागू केला नाही आणि काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी हेही भ्रष्ट आहेत. हे दोघेही पंतप्रधानपदासाठी लायक उमेदवार नसल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.
हजारे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्घी येथे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी हजारे बोलत होते. किरण बेदी, अभय बंग, डॉ. नीलिमा मिश्रा, संतोष भारतीय यांच्यासह राज्यातील कार्यकर्ते या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीसाठी आपण देशभर मोहिम राबवित असून कार्यकर्त्यांनी राज्यातील गावागावांत ही मोहीम राबवावी असे सांगतानाच स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढय़ासाठी सर्वानी सज्ज होण्याचे अवाहन ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी केले.
हजारे पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चारित्र्यवान उमेदवारांना मतदान करण्याची शपथ कार्यकर्त्यांनी मतदारांना द्यावी. लोकसभेमध्ये १६३ खासदार कलंकित आहेत. राज्यघटनेत पक्ष स्थापन करण्याविषयीची मान्यता नाही किंवा तसा उल्लेखही नाही, त्यामुळे पक्ष बेकायदेशीर आहेत. या राजकीय पक्षांनीच लोकशाहीवर अतिक्रमण केले असून जनतेने यापुढील काळात या राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.
पर्यावरणयुक्त भारत निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे अवाहन करतानाच भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणाचे महत्व सामन्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करण्याची सूचनाही त्यांनी केली. हजारे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त राळेगणसिध्दी येथे वृक्षारोपण करण्यात आले. सर्वरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. पारनेर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अण्णा हजारे युवा मंच, रियल पॉवर ग्रुप, नागेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
केजरीवालांबद्दल शंका..
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नि:पक्षपातीपणे निवडणूक लढविली तर आपण त्यांचा प्रचार करू असे सांगताना अप्रत्यक्षपणे त्यांनी केजरीवाल यांच्या नि:पक्षपातीपणाबद्दलही शंकाच व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jun 2013 रोजी प्रकाशित
मोदी व राहुल गांधीही पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत – अण्णा हजारे
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राज्यात लोकायुक्त कायदा लागू केला नाही आणि काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी हेही भ्रष्ट आहेत.

First published on: 16-06-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi and rahul gandhi both are not capable for pm hazare