सर्वाधिक तरुण असलेला देश म्हणून एकीकडे भारताची ओळख निर्माण होत असतानाच शहरात आजारी पडणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त संख्या तरुणांचीच असल्याचे धक्कादायक वास्तव आढळले आहे. प्रजा फाऊंडेशनने गेल्या वर्षभरातील विविध आजारांच्या रुग्णांची माहिती अहवालाद्वारे प्रसिद्ध केली असून मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग एवढेच नव्हे, तर मधुमेह व रक्तदाबासारख्या आजारांच्या रुग्णांमध्येही १८ ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षभरात मलेरियाच्या एकूण मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू २० ते ३९ वयोगटातील व्यक्तींचे होते. क्षयरोगाचे ३० टक्के रुग्ण व डेंग्यूचे ३८ टक्के रुग्ण या वयोगटातील होते.  २२७ विभागांतील २२ हजार ८५० घरांमध्ये जाऊन तेथील आजारांविषयी माहिती घेण्यात आली. या माहितीमधून अनेक गंभीर बाबी समोर आल्या. १८ ते ४० हा वयोगट सर्वाधिक क्रियाशील असतो. देशाची प्रगती याच वयोगटामुळे होते. याच तरुणांच्या जोरावर भारत प्रगतीची स्वप्ने पाहत असताना मुंबईतील तरुण मात्र आजारांनी बेजार आहेत. त्यातच साथीच्या आजारांसह मधुमेह, रक्तदाब असे आयुष्यभर सोबत करणारे आजारही लहान वयात होत असल्याचे दिसून आले. या आजारांसाठी कायमस्वरूपी उपचार आवश्यक असून पुढे अनेक गुंतागुंतीचे आजारही होतात. त्यामुळे या वयोगटातील व्यक्तींचा भविष्यातील आजारांवरील खर्च मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व लक्षात घेता आताच आरोग्यस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील, असे प्रजा फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता म्हणाले.
जुलाब व हगवण (म्डायरिया) यामुळे गेल्या वर्षभरात २६० जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील ३६ टक्के मृत्यू चारपेक्षा कमी वयाच्या बालकांचे होते.
क्षयरोगाचे मृत्यू प्रमाण घटले..
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत क्षयरोग मृत्यूंची संख्या ११००वरून १४०० वर पोहोचली असली तरी प्रजा फाऊंडेशनकडून मृत्यू प्रमाणपत्रांवरून केलेल्या नोंदीनुसार गेल्या पाच वर्षांत मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. २०१० मध्ये क्षयरोगामुळे तब्बल ८८२० जणांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी क्षयरोग झालेल्या चौघांपैकी एकाचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये मृत्यूंच्या संख्येत घट होऊन ती ६५८९ वर आली. यात २१७१ महिला तर ४३१५ पुरुष होते. त्याच वेळी मृत्यूचे प्रमाण दर सात व्यक्तींमागे एकावर आले आहे.
मधुमेहाची भीती वाढलेली
मधुमेह हा आजार आता केवळ श्रीमंतांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. समाजाच्या सर्वच स्तरांत हा आजार पसरत असल्याचे मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून दिसते. सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा सर्वात वरच्या गटातील प्रत्येकी एक हजार घरामागे तीन वर्षांपूर्वी असलेले ६७ मधुमेही रुग्णांचे प्रमाण किंचित कमी होऊन ६४ वर आले, त्याच वेळी सर्वात खालच्या स्तरातील एक हजार घरांमागे २०१३ मध्ये ४५ रुग्णांचे प्रमाण आता ७२ वर पोहोचले आहे. गेल्या पाच वर्षांत पालिका तसेच सरकारी रुग्णांलयातील मधुमेही रुग्णांच्या संख्येत २६ हजारांवरून ४९ हजारांपर्यंतची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी अडीच हजार मृत्यू मधुमेहामुळे होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More youth falling in different types of diseases
First published on: 23-07-2015 at 01:09 IST