यावर्षीच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये विविध चळवळी, त्यांची कार्ये, चळवळ उभारणाऱ्या माणसांच्या संदर्भातलं बरचसं लेखन आहे. या साऱ्या लेखनातून महाराष्ट्राचा (आणि देशाचाही) आजचा चेहरा आपल्या समोर येतो. सभोवतीचं सारं काही वाईट, भ्रष्ट, असंवेदनशील, अनैतिक आहे, असा समाज करून डोळ्यावर झापडं बांधून आखून दिलेल्या चाकोरीत जगणाऱ्या माणसांनी यंदाच्या दिवाळी अंकांमधील विविध चळवळींच्या संदर्भातील लेखन आवर्जुन वाचावं.
‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकात ‘फसलेल्या क्रांत्या..’ नावाची एक लेखमाला असून त्यात गिरीश कुबेर, अभिजित ताम्हणे, कुमार सप्तर्षी यांनी अलीकडच्या काळात देशात आणि जगभरात आकारास आलेल्या क्रांतीच्या चळवळींचं मूल्यमापन केलं आहे. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली चळवळ, मध्यपूर्वेतील काही देशातील अलीकडच्या लोकचळवळी, तर अमेरिका, युरोपातील ‘ऑक्युपाय वॉलस्ट्रिट’सारख्या चळवळींच्या यशापयशाचं विश्लेषण या लेखांमधून केलं गेलं आहे. शीघ्रगतीनं उभारल्या गेलेल्या चळवळींचं मानसशास्त्र आणि समाजशास्त्र कसं असतं ते हे लेखन वाचनाता कळतं.
युनिक फिचर्सच्या ‘महाअनुभव’ या मासिकाच्या दिवाळी अंकात जळगाव जिल्ह्य़ातल्या बहादरपूर या गावातील नीलिमा मिश्रा या बाईनं खानदेशातल्या चार जिल्ह्य़ातल्या दोनशे गावात स्त्रियांचे दोन हजार बचतगट, तर पुरुषांचे सातशे बचतगट उभारले. गोधडय़ा विक्रीसाठी बहादरपूर हे गाव आज जगाच्या नकाशावर दिमाखात झळकत आहे. रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार मिळालेल्या निलिमा मिश्रा यांच्या कार्याचा आढावा घेणारा मुक्ता चैतन्य यांचा लेख सकारात्मक चळवळींचं सहकारविश्व समजून घेण्यासाठी अवश्य वाचावा. अहमदनगर जिल्ह्य़ातल्या ‘स्नेहालय’ या संस्थेनं गेल्या तेवीस वर्षांपासून देहव्यापार करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्या समस्या, त्यांचं पुनर्वसन, त्यांच्या मुलांचं शिक्षण, अनौरस बालकांचं पुनर्वसन, कुमारी मातांचं पुनर्वसन, बालकामगार मुक्ती, एड्सग्रस्त महिलांचे प्रश्न सोडविणं ही आणि अशी कितीतरी कामं डॉ. गिरीश कुळकर्णी आणि ‘स्नेहालय’ ही संस्था थेट देहव्यापार चालणाऱ्या वस्त्यांमध्ये जाऊन करत आहेत. या कार्याची ओळख करून देणारा आनंद अवधानी यांचा लेख एक अलक्षित जग आपल्यासमोर उभा करणारा आहे. समस्या मोठी आहे म्हणून लक्ष न देण्याची सवय लागलेल्या आम्हा माणसांना अवकाशाएवढय़ा अंधाराला न भिणाऱ्या पणतीची गोष्ट कृतीशीलतेचा विचार करायला लावणारी आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील मेंढा (लेखा) हे गाव, तेथील कार्य समजून घेण्यासाठी मिलिंद बोकिलांचा लेख अवश्य वाचला पाहिजे.
बुंदेलखंडातल्या डंडाधारी बायकांच्या गुलाबी गँगची सुधीर लंके यांनी सांगितलेली कहाणी ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ या अंकात आहे. महिलांना सक्षम करणारी, बदलासाठी प्रवृत्त करणारी, सामूहिक परिवर्तनासाठी संघर्ष करणारी गुलाबी गँग आणि तिचा विचार, तिचं कार्य वेगळं आहे आणि महत्त्वाचंही आहे.
समाजात अनेक माणसं अनेक प्रकारची विधायक कामं जीव ओतून करीत असतात. ही माणसं कधी एकटीच कार्य करीत राहतात, कधी चळवळीही उभारतात पण, या एकटय़ा माणसांचं विधायक कार्य चळवळींना विचार व ऊर्जा पुरवणारं असते. अशा माणसांच्या कार्याची ओळख इत्यादी मनोविकासच्या दिवाळी अंकात करून दिली आहे. रवीन्द्रनाथ टोणगावकर, गजानन काशिनाथ अमदाबादकर, रवी बापटले, सी.बी. नाईक, सुरेश गायकवाड या माणसांचं कार्य प्रेरणादायी आहे. या माणसांपासून ऊर्जा घेतली पाहिजे, ही जाणीव या माणसांविषयीचं लेखन वाचताना मनात अंकुरते.
बांग्ला आंबेडकरवादी साहित्य चळवळीचा आढावा ‘मुक्तशब्द’च्या दिवाळी अंकात अरविंद सुरवाडे यांनी घेतला आहे, तर आसाराम लोमटे यांनी शरद जोशी आणि राजू शेट्टी या शेतकरी चळवळीतील दोन्ही कार्यकर्त्यांच्या कार्याचा, विचारांचा तौलनिक आढावा घेत महाराष्ट्रातील आजच्या शेतकरी चळवळीची स्थितीगतीच अधोरेखित केली आहे.
काही दिवाळी अंकातलं हे चळवळींविषयीचं लेखन, लोक आंदोलनांविषयीचं लेखन, काही माणसांचं संस्थात्मक कार्य आणि विधायक कामांचं विश्लेषण करणारं लेखन आणि या चळवळी, ही माणसं आजच्या भारताचा आणि महाराष्ट्राचा चेहरा दाखविणारी आहे. अनेक आंदोलनं अयशस्वीही झाली असतील, पण लढण्याची उमेद या आंदोलनानं जनमनात मुरवली, हे विसरून चालत नाही. खरं तर, शेकडय़ांवर प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांमध्ये चळवळींचं आजचं समाजशास्त्र मांडणारं बरेचसं लेखन आहे. चळवळी, संस्था, विधायक कार्ये, आंदोलनं, नैतिकता, कार्यकर्ते सारं काही संपलं आहे, अशी कोरडी ओरड करत राहण्यापेक्षा विविध दिवाळी अंकांमधला हा मजकूर जर वाचला तर समकालीन वास्तव तर कळतंच, पण आपण कुठं उभं राहायचं हे देखील उमजतं. अवकाशभर अंधाराला न भीता चिमूटभर उजेड देणाऱ्या पणतीचा कैवार करायचा की अंधाराचे गोडवे गायचे, ते आपण ठरवायचं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विदर्भरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movment and culture of social science
First published on: 09-12-2012 at 12:07 IST