उपनगरीय रेल्वेमार्गावरील प्रवासी आणि गाडय़ा यांचे प्रमाण व्यस्त असल्याने गाडय़ांमध्ये धड उभे राहणेही शक्य नसताना आता रेल्वेने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरही उभे राहण्याची सोय ठेवलेली नाही. मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या ठाणे, दादर अशा महत्त्वाच्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर काही ठिकाणी छतच बसवलेले नाही. त्यामुळे या स्थानकांवरून गाडी पकडणाऱ्या किंवा गाडीतून उतरणाऱ्या प्रवाशांना उन्हापावसाचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील अनेक स्थानके जागतिक दर्जाची करण्याच्या गप्पा मारणाऱ्या मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणासह मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनांना या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी मात्र वेळ नाही.मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणामार्फत मुंबईतील महत्त्वाच्या स्थानकांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ही स्थानके जागतिक दर्जाची करण्याचा रेल्वे व राज्य सरकार यांचा विचार आहे. प्रत्यक्षात मात्र पश्चिम व मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या अशा दादर आणि ठाणे या स्थानकांतील काही प्लॅटफॉर्मवर काही भागांत छप्परच नसल्याने प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि चारचा काही भाग उघडा आहे, तर मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचचा काही भाग विनाछप्पर आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा ज्या प्लॅटफॉर्मवर थांबतात, त्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरही बहुतांश भागात छप्पर नाही. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून उन्हाळ्यात गाडी पकडताना प्रवाशांना उन्हाचे चटके खावे लागतात, तर पावसाळ्यात आडोशाच्या जागी थांबलेले प्रवासी गाडी आल्यानंतर गाडी पकडण्यासाठी धडपडतात. अनेकदा या भागात छत्री उघडून उभ्या राहिलेल्या प्रवाशांना गाडी आल्यावर ती बंद करून गाडी पकडताना कसरत करावी लागते. परिणामी यामुळे भांडणे होण्याचे प्रकारही वाढल्याचे प्रवासी सांगतात.याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांना विचारले असता दादरचा प्लॅटफॉर्म क्रमांक चार खूपच अरुंद असल्याने तेथे छप्पर बसवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai railway stations
First published on: 19-08-2015 at 02:42 IST