पिंटू ऊर्फ अनिल लाजरस शिंदे (रा. चांदा, ता. नेवासे) याचा खून केल्याच्या प्रकरणात आरोपी दिपक रामभाऊ ढाकणे (वय २७, रा. सारसनगर, नगर) याला जन्मठेपेची शिक्षा झाली. सन २००९ मध्ये इमामपूर टोलनाक्यावर गोळीबार करून दिपकने पिंटूचा खून केला होता.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. करमकर यांनी त्याच्यावरचा खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची, तसेच १ हजार ५०० रूपये दंडाची व दंड न भरल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारच्या वतीने या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले. आरोपीची बाजू पुण्यातील वकील श्रीकांत शिवदे यांनी मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी दिपक याला शिक्षा ठोठावली
मयत पिंटू व आरोपी बाबासाहेब गोंदकर यांच्यात वाद होते. गोंदकर याने दिपक, तसेच चिंटू ऊर्फ सतीश आल्हाट, अमोल छजलानी, पूनम जरिया यांना िपटूचा काटा काढण्याची सुपारी दिली. त्यांनी ९ जून २००९ रोजी धनगरवाडी शिवारात इमामपूर टोलनाका येथे पिंटूला गोळ्या घालून ठार केले. आरोपी दीपक याला त्याठिकाणी असलेले पोलीस निरिक्षक विठ्ठल मोहोकर यांनी त्याच्याकडे असलेल्या गावठी पिस्तुलासह पकडले. अन्य आरोपी पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी पुरावा वगैरे जमा करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान १३ साक्षीदार तपासण्यात आले. अन्य तपासणी अहवालांचा भक्कम पुरावा होता. तो न्यायालयासमोर मांडण्यात आला. आरोपीच्या वतीने आपण गोळी झाडलीच नाही असा बचाव करण्यात आला. पिस्तुलावर आरोपीच्या हातांचे ठसे सापडल्याने तो फेटाळण्यात आला व त्याला शिक्षा ठोठावण्यात आली.