केवळ दोन एकर शेतीच्या वादाने एकाच कुटुंबातील चौघांची भीषण हत्या करण्यात आली. सोमवार, १४ एपिलला सायंकाळी ६ वाजल्यानंतर हा प्रकार येथून सुमारे २२ कि.मी. अंतरावरील बाळापूर तालुक्यातील बाखराबाद या खेडय़ात घडला. या प्रकाराने कालपासून हे गाव हादरले असून भयभीत झालेले गावकरी अजूनही सावरलेले नाहीत. एकाच कुटुंबातील व विशेष म्हणजे, भाऊबंदकीत असलेल्यांनी ही हत्या केली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

सुमारे १५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये भगवंतराव माळी यांनी गजानन माळी यांच्याकडून २ एकर शेती विकत घेण्याचा सौदा केला होता. ही शेती भगवंतराव यांनी आपल्या मुलाच्या नावे करून दिली होती. त्यानंतर गजानन माळी यांनी ही शेती विक्री करून देण्यास नकार दिला. परिणामी, भगवंतराव माळी यांनी न्यायालयात धाव घेतली. हा वाद बरीच वष्रे न्यायालयात चालल्यानंतर आता न्यायालयाने ही दोन एकर शेती भगवंतराव माळी यांना देण्याचा निर्णय दिला व शेतीचा ताबाही दिला. यावरून गजानन माळी व त्यांची दोन मुले यांना संताप आला. शेताचा ताबा घेणाऱ्यांना ठार मारण्याचे बेत सुरू झाले. अशा वेळी त्यांना संधी सापडली व सोमवार, १४ एप्रिलला सायंकाळी गजानन माळी व त्यांच्या मुलांनी चौघांची हत्या करून आपले षडयंत्र तडीस नेले. सोमवारी गजानन माळी, नंदेश गजानन माळी, व दीपक गजानन माळी यांनी शेतात काम करण्यास गेलेल्या वनमाला विश्वनाथ माळी (४५) व राजेश भगवंतराव माळी (३८) यांच्यावर हल्ला करून कुऱ्हाडीचे घाव घालून दोघांनाही ठार केले. इतके करूनही आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी हे भीषण कृत्य केल्यावर विश्वनाथ माळी यांच्या घरावर चाल केली. त्यावेळी तिकडे शेतात काय झाले, याची घरातील विश्वनाथ माळी (८०) व योगेश भगवंतराव माळी (२७) यांना काहीच कल्पना नव्हती. ते सर्व आरोपी घरी आल्यावर त्यांनी ताबडतोब घरातील विश्वनाथ माळी व योगेश यांच्यावर कुऱ्हाड व सुरीने हल्ले करून त्यांचीही निर्घृण हत्या केली.
पोलिसांनी या प्रकरणी हल्लेखारे गजानन माळी व नंदेश माळी या दोघांना अटक केली, तर यातील तिसरा हल्लेखारे दीपक माळी हा सध्या फरार झाला आहे. प्रभावती विश्वनाथ माळी या महिलेच्या समक्ष विश्वनाथ माळी व योगेश माळी यांची हत्या करण्यात आली.
भगवंतराव माळी अकोल्याच्या गोकुळ वसाहतीत राहतात. हृदयविकार असल्याने दोन मुलांची इतकी भीषण हत्या झाल्याची माहिती लगेच त्यांना देण्यात आली नाही. त्यांच्या राजेश व योगेश या दोन मुलांपैकी राजेश विवाहित आहे. त्याच्या पत्नीसही लगेच ही माहिती देण्यात आली नाही.
विश्वनाथ माळी यांच्या घरी येऊन आरोपींनी प्राणघातक हल्ला केला तेव्हा अनेक लोक तो प्रकार बघत होते, पण कोणीही विश्वनाथ व योगेश यांना वाचविण्यासाठी पुढे आले नाही.
पोलीस अधीक्षक वीरेंद्र मिश्र, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, शहर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, बाळापूरचे ठाणेदार यांनी या भागाला भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली.
तो थरार व जीवाचा थरकाप..
गजानन माळी, नंदेश माळी व दीपक माळी हे शेतात गेले व त्यांनी शेतातील वनमाला व राजेश माळी यांच्याशी वाद सुरू केला. वाद हे केवळ वरवरचे कारण होते. त्यांना या दोघांना ठारच करायचे होते, पण आधी वाद उकरून काढला. वाद वाढल्यावर हीच संधी आहे, हे पाहून या तिघांनी सोबत आणलेली कुऱ्हाड व धारदार शस्त्र काढले. ते पाहून वनमाला व राजेश जीवाच्या आकांताने पळत सुटले, पण आता यांना सोडून चालणार नाही, या विचाराने ग्रासलेल्या गजानन, नंदेश व दीपक माळी यांनी प्रथम वनमाला यांना कुऱ्हाडीचे घाव घालून जागीच ठार केले, तर पळणाऱ्या राजेशचा पाय शेतातील नाली ओलांडतांना नालीत गेला व तो कोसळला. ही संधी मारेकऱ्यांना पुरेशी होती. त्यांनी कुऱ्हाडीसह धारदार शस्त्राने वार करून त्यालाही ठार केले.