शहरात सध्या संशयित डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत आहे. अशा रुग्णांनी महापालिकेच्या काही रुग्णालयात सवलतीच्या दरात उपलब्ध असलेल्या डेंग्यू चाचणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी केले.
डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. या उपाययोजनेचा आढावा घेण्यासाठी आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानाहून महापौर प्रवीण दटके यांनी हे आवाहन केले. या बैठकीत दहाही झोनचे अधिकारी उपस्थित होते. शहरात जेथे कुठे डेंग्यूचे व हिवतापाचे रुग्ण आढळून येत आहे, त्यांच्या घरी आरोग्य कर्मचाऱ्यांनी भेट घ्यावी. तसेच डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृती करावी. त्याचप्रमाणे सदर रोग निदान केंद्र, महाल येथील स्व. प्रभाकर दटके रोग निदान केंद्र व इंदिरा गांधी रुग्णालयात सवलतीच्या दरात एन.एस.१ ही चाचणी केली जात आहे. ही चाचणी फक्त ३५० रुपयांमध्ये होत असल्याने त्याच लाभ संशयित रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन करून या रुग्णालयांसमोर डेंग्यू चाचणीचे फलक लावावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सीटी हेल्थ रुग्णवाहिकेसह डेंग्यूचा उद्रेक झालेल्या परिसरात जाऊन रुग्णांची तपासणी करावी. तसेच वेळोवेळी परिसरातील नगरसेवकांशी संपर्क साधून केलेल्या कामाची माहिती द्यावी, असे निर्देशही महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. गेल्या चार दिवसात शहरातील १३२ घरी जाऊन तेथील संशयित डेंग्यू आजाराच्या रुग्णांचे नमुने घेतले. तसेच ३३ रुग्ण बरे झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
या बैठकीला उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, आमदार अनिल सोले, आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अपर आयुक्त हेमंतकुमार, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे सभापती जगदीश ग्वालबंशी, माजी उपमहापौर संदीप जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, हत्तीरोग अधिकारी सुधीर फटींग उपस्थित होते.