देशातील सर्वसाधारण निवडणुका अंतिम टप्प्यात असून निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगू लागले आहेत. निवडणुकांच्या रिंगणात उभे ठाकलेले भाजपचे पंतप्राधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची जोरदार ‘हवा’ यंदा सर्वत्र पाहवयास मिळत आहे.  त्यांची ही ‘हवा’ सोशल मीडियावरही चांगलीच रंगली आहे. एप्रिल महिन्यात युटय़ुबवर सर्वाधिक म्हणजे तब्बल ३२ लाखांहून अधिक व्ह्यूज मोदी यांच्या व्हिडीओजना मिळाले आहेत. त्यांना याबाबतीत टक्कर देणारे दोनच राजकीय नेते आहेत. यामध्ये ‘आप’चे अरिवद केजरीवाल आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठकारे यांचा समावेश आहे. याशिवाय ‘टॉप १०’ यादीत विडंबनात्मक व्हिडीओजचा समावेश आहे.  
यंदाच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. यामुळे विविध प्रकारच्या राजकीय व्हिडीओजनी युटय़ुब सध्या गजबलेले असून या एकाच वेबसाइटवर भारतीय राजकारण्यांची भाषणे किंवा त्यांच्या मुलाखतींचे किंवा विडंबनात्मक असे सुमारे दहा हजारहून अधिक तासांचे व्हिडीओज अपलोड झाले आहेत. या व्हिडीओजना प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळत आहे. यातील विशेष बाब म्हणजे विडंबनात्मक व्हिडीओजनाही लोकांनी भरभरून दाद दिली आहे. एप्रिल महिन्यात सर्वात लोकप्रिय ठरलेल्या दहा युटय़ुब व्हिडीओजची यादी नुकतीच युटय़ुबने प्रकाशित केली आहे. यामध्ये मोदी यांची ‘आप की अदालत’मध्ये झालेल्या मुलाखतीलच्या व्हिडीओला सर्वाधिक ३२ लाखांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत. या खालोखाल ’सो सॉरी: व्हेन मोदिबिकेम अ डॉन’ या विडंबनात्मक व्हिडीओला दाद मिळाली आहे. या व्हिडीओ ला सुमारे साडे तेरा लाख हिट्स मिळाल्या आहेत. यानंतर यादीत तिसरे स्थान मिळावले आहे ते आमीर खान आणि आम आदमी पक्षाचे अरिवद केजरीवाल यांच्यातील चेर्चच्या व्हिडीओला. चौथ्या स्थानावर राज ठाकरे यांचा ’फ्रॅक्ली स्पिकिंग’मधील मुलाखतीने न मिळवले आहे. यानंतर ‘मेकिंग ऑफ नरेंद्र मोदीज आप की अदालत’ या व्हिडीओचा क्रमांक येतो. सहाव्या स्थानावर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच येतात. हा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा आहे. यानंतर पुन्हा राज ठाकरे यांचा क्रमांक येतो. सातव्या स्थानावरील त्यांच्या या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांची ‘आप की अदालत’मधील मुलाखतीचा व्हिडीओ आहे. तर आठव्या स्थानावर दिल्ली येथे केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगाविलेला व्हिडीओने स्थान मिळवले आहे. या व्हिडीओला तब्बल एक लाख ३० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. यानंतर नवव्या क्रमांकावर पुन्हा राज ठाकरे यांचा व्हिडीओ येतो. यामध्ये एका वृत्त वाहिनीला मुलाखत देत असाताना त्यांनी उत्तर भारतीयांबद्दलची आपली भूमिका मांडली होती. तर दहाव्या स्थानावर केजरीवाल यांच्यावर विडंबनात्मक तयार करण्यात आलेल्या ’झाडू डान्स’ या गाण्याचा व्हिडीओ आहे. युटय़ुबवरील या व्हिडीओजनी एप्रिल महिना गाजवला आहे.