महानगराच्या कुशीत असलेले जगातील एकमेव असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विविध पर्यावरण संस्थांद्वारे पक्ष्यांसंबंधी नोंदी होत असल्या तरी बऱ्याच वर्षांनंतर वनविभागाच्या पुढाकाराने पक्ष्यांची अद्ययावत माहिती नोंदवण्यात येणार आहे.  
बोरिवलीला पश्चिम द्रुतगती मार्गाला बिलगून असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान शनिवार-रविवार पर्यटकांमुळे गजबजून जाते. मात्र अनेकांना या जंगलात फिरण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे नकाशे नसतात. जंगलवाटा, तेथील वृक्ष, पशू-पक्षी यांची माहिती नसल्याने वनसंपदेचा आस्वाद घेण्याची संधी पूरेपूर अनुभवता येत नाही. हे उद्यान पर्यटकस्नेही करण्यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत. पाऊलवाटांचे नकाशे, पशू-पक्ष्यांची माहिती प्रवेशद्वाराजवळच उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या पानगळीचा मोसम सुरू असल्याने या काळात पक्ष्यांची नोंद अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत विविध पर्यावरण संस्थांच्या मदतीने हा उपक्रम पूर्ण केला जाईल.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या ‘इम्पर्ॉटट बर्ड एरियाज ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे नुकतेच नागपूर येथील पक्षिमित्र संमेलनात प्रकाशन झाले. या पुस्तकात राज्यातील प्रमुख पक्षिक्षेत्रांमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे.  पक्ष्यांच्या नोंदी घेण्यासाठी बीएनएचएसचे सदस्यही सहभागी होणार आहेत.  उद्यानाचा आकार लहान असला तरी येथे पक्ष्यांच्या बहुविध प्रजाती आढळतात. स्थानिक, स्थलांतरित, जंगली, गोडय़ा पाण्यातील तसेच वसईच्या खाडीजवळ खाऱ्या पाणथळ जागांमधील पक्षिप्रजाती या उद्यानात आहेत. या उद्यानात २५० हून अधिक जातीचे पक्षी आढळतात, असे बीएनएचएसचे जनसंपर्क अधिकारी अतुल साठय़े म्हणाले. या पक्ष्यांमध्ये विविध जातीचे ससाणे, घारी, गरुड, धनेश, खंडय़ा, घुबड यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National park birds registration
First published on: 11-01-2014 at 01:36 IST