देशात जागतिकीकरणाने वेग घेतला असला तरी अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीयीकरणातील मुलभूत नियमांचा एकूण प्रगतीला अडथळा होत असल्याचे मत ज्येष्ठ उद्योगपती तथा फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांनी आज येथे व्यक्त केले.
डॉ. भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या आयएमएससीडीआर या व्यवस्थापन संस्थेने आयोजित केलेल्या ‘जागतिक व्यवस्थापन क्षेत्राची सद्यस्थिती आणि नवीन दिशा’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डब्लू. एन. गाडे होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खेडकर, डॉ. वाय. के. भूषण, संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. एम. अॅस्टन, सचिव फिलीफ बार्नबस, सरसंचालक डॉ. शरद कोलते, संचालक डॉ. एम. बी. मेहता व परिसंवादाच्या सचिव डॉ. मीरा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. फिरोदिया म्हणाले, जागतिकरणाच्या प्रक्रियेत राष्ट्रीयीकृत बँकांचा मोठा वाटा आहे, मात्र या बँका व एकुणच देशाची अर्थव्यवस्था नियामांच्या जाचक जंजाळात अडकली आहे. त्यात अधिक खुले धोरण घेणे गरजेचे आहे. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत मागच्या वीस वषार्ंत बरेच बदल झाले. देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर स्पर्धात्मक आव्हाने स्वीकारावी लागतील. त्यासाठी शिक्षण, तंत्रज्ञान, मनुष्य बळ, नैतिक मुल्य व कौशल्य यांचा योग्य वापर केला पाहिजे.
डॉ. गाडे यांनी आजच्या व्यवस्थापनात नैतिक मुल्यांची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, देशातील सद्यस्थिती लक्षात घेता फक्त विरोधासाठी विरोध ही भूमिका घेतली जाते. ते टाळून त्वरीत व योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे. औद्योगिकरणातील असंघटीतपणाचेही विपरीत परिणाम या क्षेत्रासह अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. खेडकर यांचेही यावेळी भाषण झाले. संस्थेचे सरसंचालक डॉ. शरद कोलते यांनी प्रास्ताविक केले. या तीन दिवसीय परिसंवादात १६५ शोधनिबंध सादर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अमोल प्रभाकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एम. बी. मेहता यांनी आभार मानले. वर्षां पंडीत यांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Maharashtra SSC Result 2023 Live: दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट इथे पाहा