डोंगर दऱ्या.. घनदाट अरण्य.. नागमोडी वळणाचा सुमारे २५ किलोमीटरचा चढण रस्ता.. सुंदर तलाव आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंचीवरील थंड हवेचे ठिकाण असा नावलौकिक. एखादे स्थळ पर्यटनात्मकदृष्टय़ा विकसित करण्यासाठी यापेक्षा आणखी काय हवे?
निसर्गाने देता येईल तितके सौंदर्य भरभरून दिलेले तोरणमाळ अजूनही विकासाच्या अनेक वाटांपासून दूरच आहे. आदिवासी भागात असल्यामुळे असेल कदाचित किंवा या भागाला आतापर्यंत लाभलेल्या लोकप्रतिनिधींना तोरणमाळच्या पर्यटनात्मक विकासात विशेष ‘अर्थ’ दिसला नसेल म्हणून असेल तोरणमाळ अजूनही सुधारणांच्या प्रतीक्षेत आहे.
सातपुडय़ाच्या डोंगररांगेत विसावलेले तोरणमाळ म्हणजे निसर्गसंपदेची खाणच. मुंबईपासून ५१० किलोमीटर, नाशिकपासून ३०५, धुळ्यापासून १२६, तर जवळचे रेल्वे स्थानक असलेल्या नंदुरबारपासून ७८ किलोमीटरवर असलेल्या तोरणमाळची उंची समुद्रसपाटीपासून ३,७७० फूट आहे. तोरणमाळपासून सर्वाधिक जवळचे (५५ किमी) मोठे शहर म्हणजे शहादा. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी, वळणावळणाचा तितकाच अनेक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कठडे नसल्याने धोकादायक वाटणारा रस्ता, वाहनचालकांच्या कौशल्याची परीक्षा पाहणारा सात पायरी घाट, हे सर्व अनुभवणे म्हणजे एक ‘थ्रील’च. सुमारे २५ किलोमीटरचा चढण मार्ग संपल्यानंतर निसर्गाच्या पोटात दडलेला यशवंत तलाव आपले स्वागत करतो. सुमारे २७ मीटर खोल असलेला हा तलाव तोरणमाळचे मुख्य आकर्षण. तलावाच्या कडेकडेने फिरण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडी लावल्यास फिरण्यातील मजा अधिकच वाढू शकेल. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या या तलावात पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था
सहजशक्य आहे. काही दिवसांपूर्वी हा प्रयोग करण्यातही आला होता, परंतु त्यात गांभीर्य नसल्याने तो बारगळला. तलावाभोवती आकर्षक उद्यानही सहज करता येण्यासारखे आहे. विशेष म्हणजे ही कामे खूप खर्चीक आहेत असेही नव्हे.
आदिवासींची टिपिकल ९०-१०० घरे म्हणजे तोरणमाळ. इतर ठिकाणच्या काही जणांनी पर्यटकांसाठी घरे बांधली आहेत. त्याशिवाय वन विभाग आणि एमटीडीसीचे परंतु रावळ ग्रुपला करार तत्त्वावर देण्यात आलेले विश्रामगृह येथे आहे. दोन-तीन घरगुती स्वरूपाच्या हॉटेलांमध्ये पर्यटकांच्या जेवणाची सोय होऊ शकते. निवास आणि आहार या महत्त्वपूर्ण गोष्टींशी संबंधित या तिन्ही ठिकाणांचा उपयोग सातपुडय़ातील रानमेव्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी करता येण्यासारखा आहे. उदाहरणार्थ करवंदे, करवंदांचे लोणचे, तोरणमाळचे लोणचे, सीताफळ, आंबे, आवळा, मध, आमसूल, चारोळी, वनौषधी इत्यादी. महाबळेश्वरपेक्षाही उत्तम प्रतीची अशी स्ट्रॉबेरी या परिसरात येते. मधुमक्षिका पालन उद्योगही भरभराटीस येऊ शकतो. या सर्वाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही मिळू शकतो, परंतु त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची. तोरणमाळच्या जंगलात आंबा, करवंदे, साबरकाठा, शिसम, महू, साग, बांबू, अंजन, पळस अशी झाडी पाहावयास मिळतात.
तोरणमाळच्या प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत नागार्जुन मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, सीताखाई आणि कमळ तलाव यांचाही समावेश करावा लागेल. पर्यटन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणांची अवस्था तशी गंभीरच. गोरक्षनाथ मंदिराकडे जाण्याचा रस्ता पर्यटकांपेक्षा गिरिभ्रमण करणाऱ्यांना अधिक जवळचा वाटावा असा आहे. मुख्य रस्त्यापासून १० ते १५ किलोमीटर अंतर चालत गेल्यावर एका गुहेत असलेल्या गोरक्षनाथांचे दर्शन होते. महाशिवरात्रीला गोरक्षनाथाच्या दर्शनासाठी मध्य प्रदेश व गुजरातमधूनही हजारो भाविक येत असतात. या भाविकांसाठी ना धड रस्ता ना दरीच्या बाजूने कठडे. याउलट आधीच पर्यटकांना ‘सावधान’ करणारा फलक लावून जबाबदारी झटकण्यात आली आहे. अशीच स्थिती तोरणमाळच्या चढण रस्त्याची म्हणावी लागेल. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कठडेही बांधलेले नाहीत. वाहनधारकांची सुरक्षितता घेण्याऐवजी फक्त ठिकठिकाणी ‘धोकादायक वळण’, ‘अपघातप्रवण क्षेत्र’ अशा सूचना देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने समाधान मानले आहे.
अशी ‘काळजीवाहू’ स्थिती असतानाही निसर्गप्रेमी पर्यटक तोरणमाळला जात असतात. महाराष्ट्रातील एक सर्वागसुंदर असे पर्यटनस्थळ म्हणून तोरणमाळचा विकास करण्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी अधिक पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यावर तोरणमाळ राज्यातील इतर कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणाची स्पर्धा करू शकेल.

pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
22 high tide days during monsoon
यंदा समुद्राला पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती…२०,२१ सप्टेबरला जुलैला सर्वात मोठी उधाणे, सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण