जिल्हय़ात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीबद्दल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला जाहीर समज द्यावी, चार खडे बोल सुनवावेत व जाहीर जाब विचारतानाच चार उपदेशाचे डोस पाजावेत, असा प्रकार अनेकदा घडला. राष्ट्रवादीच्या अभ्यास शिबिरानिमित्ताने त्याचीच पुनरावृत्ती घडली.
राष्ट्रवादीचे मराठवाडा विभागीय अभ्यास शिबिर पार पडले. पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह मराठवाडय़ातले सर्व मंत्री अभ्यास शिबिराला उपस्थित होते. कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांचे वैचारिक भरण-पोषण करणे हा शिबिराचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. अलीकडे गुत्तेदारी हाच कार्यकर्त्यांचा भरण-पोषणाचा मुख्य व्यवसाय आहे, असे वाटत असतानाच असेही काही वैचारिक भरण-पोषण असू शकते असे या निमित्ताने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही कळाले.
जिल्हय़ात राष्ट्रवादीतल्या गटबाजीचा उल्लेख सर्वच नेत्यांनी केला. आता ही गटबाजी एवढी डोके वर काढत नसली, तरी या गटबाजीने नाकीनऊ आणले होते, असे आर. आर. पाटील म्हणाले. दर आठ दिवसांनी जिल्हय़ाचे शिष्टमंडळ गाऱ्हाणी घेऊन यायचे. या आठवडय़ात असलेल्या शिष्टमंडळातले नेते लगेच दुसऱ्या आठवडय़ात दुसऱ्याच शिष्टमंडळात दिसायचे. अशा वेळी अशा नेत्यांनी त्या वेळी बोललेले खरे मानायचे की नंतर बोललेले खरे मानायचे, असा पेच आम्हालाच पडायचा. आजवर राज्याचे राजकारण बरेच समजले, पण परभणीचे समजले नाही, असेही या वेळी आर. आर. पाटील म्हणाले.
जिल्हय़ात कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकच खंत वारंवार व्यक्त होते. पक्ष परभणीसाठी सर्व काही देतो, पण हा जिल्हा राष्ट्रवादीसाठी मात्र काहीच देत नाही. राष्ट्रवादीचा एकही आमदार विधानसभेत नसलेले महाराष्ट्रात आठ जिल्हे आहेत. या जिल्हय़ांत परभणीचा समावेश आहे. फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. जिल्हय़ात महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समित्या या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळते. मग आमदार-खासदारकीला काय नाही? असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. आता भांडणे मिटली आहेत. भविष्यात तरी काही चांगले दिसून यावे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.
गटबाजी आमच्या बीड जिल्हय़ातही होती. पण आम्ही एकदिलाने काम करून विधानसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले, असे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी लोकसभेची जागा राष्ट्रवादीने जिंकावी अशी अपेक्षा करीत जालना जिल्हय़ाचा मोठा भाग परभणी लोकसभा मतदारसंघात असल्याचे व्यासपीठावरील उपस्थितांच्या नजरेत आणून दिले. गेल्या निवडणुकीत सुरेश वरपुडकर यांना संपूर्ण जिल्हय़ात कमी मतदान झाले असताना जालना जिल्हय़ातल्या अंबड, घनसावंगी या विधानसभा मतदारसंघांतच मताधिक्य मिळाले होते, याची आठवण करून दिली. टोपे यांच्या या वक्तव्यावर या वेळी लोकसभेला उमेदवार कोण? असे खुद्द अजित पवारांनीच जाहीर विचारले.
पवार यांच्या भाषणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही बऱ्याच कानपिचक्या होत्या. ‘पुढाऱ्यांसारखे कडक कपडे घालून मिरवू नका, नेत्यांच्या गळय़ात मोठमोठे हार घालू नका, जेवढा मोठा हार तेवढी गडबड जास्त असे मला नेहमीच वाटते. सकाळी लवकर उठा, जनतेसाठी किती वेळ देता याचा विचार करा. काही कार्यकर्त्यांना रात्री चंद्रावर जायची सवय असते’ असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना समज दिली. आपल्या भाषणात पवार यांनी पक्षाच्या नावावर दुकानदारी करणाऱ्यांचाही समाचार घेतला. पक्षाच्या नावावर चाललेली दुकाने बंद करा, नसता आम्हीच तुमचे दुकान कधी बंद करू हे तुम्हाला कळणारही नाही, असा इशाराही   पवार   यांनी भाषणातून दिला.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp study camp for party worker
First published on: 16-10-2012 at 02:17 IST