पावसाच्या सरीसोबत पडणारे रस्त्यावरचे खड्डे मुंबईकरांच्या पाचवीला पुजले आहेत. या वर्षी तर पावसाळा संपल्यावर आता डिसेंबरमध्येही शहरातील ठिकठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले आहेत. मात्र, २०१५ मध्ये मुंबईत २१४० कोटी रुपयांची रस्त्याची कामे पूर्ण होणार असून नव्याने डांबरीकरण केलेले आणि काँक्रीटचे नवे रस्ते होणार असून त्यामुळे मुंबईकरांना होणारा खड्डय़ांचा त्रास या वर्षी कमी होण्याची आशा आहे. त्याचबरोबर तीस मीटरपेक्षा अधिक रुंदी असलेल्या रस्त्यांवर पादचाऱ्यांना सोयीचे ठरतील, असे नव्या पद्धतीचे पदपथही बांधण्यात येत आहेत.
पालिकेच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनंतर निविदा प्रक्रिया काढून रस्त्यांच्या कामांना आता सुरुवात झाली आहे. २१४० कोटी रुपयांपैकी १०३५ कोटी रुपये रस्त्यांच्या पृष्ठभागाची दुरुस्ती करण्यासाठी वापरले जातील. त्यातील ४३५ कोटी रुपये पूर्व उपनगरांतील रस्त्यांसाठी तर ३२२ कोटी रुपये पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामासाठी खर्च होत आहेत. तर २७८ कोटी रुपये दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामासाठी खर्ची पडणार आहेत.
बहुवार्षकि प्रकल्पांतर्गत ८९५ कोटी रुपये खर्च करून काँक्रीटचे रस्ते बांधण्यात येत आहेत. त्यातील १७७ कोटी दक्षिण मुंबई, ५०१ कोटी पश्चिम उपनगरात तर २१७ कोटी रुपये पूर्व उपनगरांमधील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी वापरण्यात येत आहेत.  
मरिन ड्राइव्हच्या सुशोभीकरणाचे काम पालिकेने गेल्या जानेवारीत हाती घेतले आहे. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असले तरी ते या वर्षभरात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण व दुरुस्ती यांचा यात समावेश आहे. ब्रीच कॅण्डीजवळच्या रस्त्याचे रखडलेले कामही आता सुरू करण्यात आले आहे. .
जिजामाता उद्यानाचा विकास
गेली दहा वष्रे फक्त चच्रेचा व कागदापुरता राहिलेला जिजामाता प्राणिसंग्रहालयाच्या विकासाचा प्रकल्प या वर्षी मार्गी लागण्याची शक्यता आहे. या उद्यानाच्या कामाला अजूनही पुरातन वारसा समितीने संमती दिली नसली तरी या वर्षभरात हे काम पूर्ण होऊन मुंबईकरांना पुन्हा एकदा चांगले उद्यान मिळण्याची शक्यता आहे. याच्या जोडीनेच पवईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विशेष पक्षी उद्यान सुरू करण्याचाही पालिकेचा मानस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New roads in
First published on: 01-01-2015 at 12:21 IST