लातूर शहर वाहतुकीसाठी ६० बसची खरेदी करण्यास मंजुरी मिळाली. केंद्र सरकारकडून यासाठी ३८ कोटींचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिल्लीहून ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.
महापालिकेने केंद्राकडे जवाहरलाल नेहरू नागरी उत्थान योजनेंतर्गत शहर वाहतूक व पूरक यंत्रणेसाठी १०० टक्के अनुदानाचा प्रस्ताव दाखल केला होता. केंद्रीय नगरविकास विभागाच्या योजना मंजुरी समितीचे मुख्य सचिव डॉ. सुधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिल्लीत बठक झाली. बठकीत लातूर महापालिकेने दिलेला प्रस्ताव जसाच्या तसा मंजूर झाला. बस वाहतुकीसाठी शहरात बसडेपो, वाहनतळ व सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठीही अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षभरापासून लातूरकरांना शहर बस वाहतुकीविना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. ६० पकी १० बस वातानुकूलित, तर १० मिनीबस राहणार आहेत. उर्वरित ४० सर्वसाधारण बस राहणार आहेत.