मोटारसायकल खरेदी करण्यासाठी माहेरातून ४० हजारांची रक्कम घेऊन येत नाही म्हणून सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील शेंडेचिंच येथे घडली. याप्रकरणी पतीसह सासू व सासऱ्याविरूध्द नातेपुते पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
ऊर्मिला ऊर्फ पार्वती मनोहर जाधव (वय २०) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती मनोहर, सासू राजाबाई व सासरा भगवान महादेव जाधव यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. मृत ऊर्मिला हिचे वडील सुरेश बाबू मलमे (रा. बेवनूर, ता.जत, जि. सांगली)यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मृत ऊर्मिला हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. पंरतु लग्नानंतर काही महिन्यांनी सासरी तिचा छळ सुरू झाला. मोटारसायकल खरेदीसाठी माहेरातून ४० हजारांची रक्कम घेऊन ये म्हणून सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. परंतु त्याची पूर्तता न केल्यामुळे ऊर्मिला हिचा सासरी आणखी छळ होऊ लागला. त्यामुळे तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला.
दुसरा हुंडाबळी
बांधकामाच्या साहित्यासाठी माहेरातून दीड लाखांची रक्कम आणत नाही म्हणून सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून तेजश्री सचिन शिंदे (वय २४) हिने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात गंभीर भाजून मृत्युमुखी पडली. याप्रकरणी माढा पोलिसांनी सासरच्या चौघाजणांविरूध्द हुंडाबळीचा गुन्हा नोंदविला आहे. माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे हा प्रकार घडला. पती सचिन शिंदे, सासरा महादेव शिंदे, सासू रेखा शिंदे व दीर गजानन शिंदे या चौघा जणांना अटक झाली आहे.