पोलिसांच्या धडक मोहिमांमुळे शहरातील गुन्हेगारी काहिशी आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत असतानाच शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास कारच्या काचा फोडून संशयितांनी सुमारे नऊ लाखाची रोकड लांबविल्याने खळबळ उडाली आहे. गुरूवारी गोदावरी दूध संघाच्या शाखेतूनही भरदुपारी लूट झाल्याच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा भरदुपारी व्यावसायिकाला लूटण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण सरोदे या बांधकाम व्यावसायिकाची ही रक्कम होती. शुक्रवारी सकाळी नाशिकरोड येथे जागेचा व्यवहार करून ते मोटारीने दुपारी बाराच्या सुमारास गंजमाळ येथे आले. परिसरात कार उभी करून ते दुय्यम निबंधक कार्यालयात गेले.
त्यावेळी चालकही गाडीतून बाहेर उतरला. कारमध्ये कोणी नसल्याची संधी साधून चोरटय़ांनी काच फोडून रोकड असलेली बॅग पळवली. या वेळी मोटारीचे टायरही पंक्चर करण्यात आले. दुय्यम निबंधक कार्यालयातील काम आटोपून आल्यावर वाहनातून रोकड गायब झाल्याचे सरोदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरीत पोलिसांशी संपर्क साधला. अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये चोरटय़ांनी हा सर्व प्रकार पार पाडला. बॅगेत नऊ लाख ८० हजार रूपये होते, असे सरोदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरटय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गंजमाळ हा अतिशय गजबजलेला परिसर आहे. विविध स्वरूपाची दुकाने, शासकीय कार्यालये व मुख्य टपाल कार्यालय या परिसरात आहे. गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गही धास्तावला आहे. चोरटय़ांनी बॅग घेऊन पायी पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. श्वान पथकाच्या माध्यमातून पोलिसांनी माग काढण्याचा प्रयत्न केला. पाळत ठेवून ही चोरी झाल्याची शंका तपास यंत्रणेने व्यक्त केली आहे.
शहरात यापूर्वी बँकेतून पैसे काढल्यानंतर रोकड गायब करण्याचे प्रकार घडले आहेत. महिलांच्या अंगावरील दागिने गायब होण्याच्या घटनांचा आलेख बराच उंचावला होता. एकटय़ा दुकटय़ाला गाठून लुबाडणूक करणे, रात्रीच्या वेळी प्रवाशांची लूट असे प्रकार सर्रासपणे घडत असताना पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांनी हे प्रकार रोखण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली. कोम्बिंग ऑपरेशन, प्रमुख रस्त्यांवर वाहनांची तपासणी, गुन्हेगारांवर कारवाई, तडिपारी अशा कारवायांच्या माध्यमातून शहरातील प्रचंड प्रमाणात वाढलेले गुन्हेगारीचे प्रमाण पोलिसांनी आटोक्यात आणले. शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आल्याचे आशादायक चित्र निर्माण होत असताना व्यावसायिकांची लूट करण्याच्या लागोपाठच्या दोन घटनांमुळे त्यास छेद देण्याचा प्रयत्न गुन्हेगारांकडून होत असल्याचे दिसत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये नऊ लाखाची लूट तर…
पोलिसांच्या धडक मोहिमांमुळे शहरातील गुन्हेगारी काहिशी आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत असतानाच शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास कारच्या काचा फोडून संशयितांनी सुमारे नऊ लाखाची रोकड लांबविल्याने खळबळ उडाली आहे.
First published on: 05-01-2013 at 01:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine lakhs predation in nasik crime series in uttar maharashtra