अंधेरीच्या ‘सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालया’ला २०१० साली स्वायत्तता मिळाल्यानंतर येथून उत्तीर्ण झालेल्या एकाही विद्यार्थ्यांला मुंबई विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे पदवी प्रमाणपत्र न मिळाल्याने तब्बल एक हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व करिअरविषयक भवितव्य अडचणीत आले आहे.जून, २०१०ला या महाविद्यालयाला ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) शैक्षणिक स्वायत्तता बहाल केली. त्यानंतर येथील विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावरच होत असल्या तरी त्यांना पदवी प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडूनच मिळायला हवे होते. त्यासाठीचे शुल्क विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरतानाच विद्यापीठाकडे अदा केले होते. मात्र, दोन वर्षे झाली तरी विद्यापीठाकडून प्रमाणपत्र न आल्याने हे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
पदव्युत्तर शिक्षण, नोकरी, पदोन्नती अशा असंख्य कारणांसाठी पदवी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. महाविद्यालयाची एक माजी विद्यार्थिनी हवाई दलात भरती झाली आहे. तिचे प्रशिक्षण संपल्याने आता तिला नोकरीवर रितसर रुजू व्हायचे आहे. त्यासाठी तिला पदवी प्रमाणपत्र हवाईदलाच्या प्रशासनाकडे सुपूर्द करावे लागणार आहे. पण, हातात प्रमाणपत्र नसल्याने तिची अडचण झाली आहे. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना पदव्युत्तर तसेच परदेशात शिक्षणासाठी या प्रमाणपत्राची गरज भासते आहे. हतबल विद्यार्थी प्रमाणपत्रासाठी महाविद्यालय व विद्यापीठाच्या परीक्षा विभागात चकरा मारत आहेत. पण, त्यांच्या पदरी निराशा येते आहे.२०१०नंतर महाविद्यालयाच्या २०१०-११ आणि २०११-१२ या शैक्षणिक वर्षांचे निकाल जाहीर झाले. पण, दोन्ही वर्षांची प्रमाणपत्रे विद्यापीठाने तयार केलेली नाहीत. या संदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियंत्रक डी. जी. वसावे यांच्याशी संपर्क साधला असता प्रमाणपत्र देण्यास विलंब झाल्याचे मान्य केले. महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे पदवी प्रमाणपत्र तयार करण्यास उशीर झाला. मात्र, त्यांची प्रमाणपत्रे तयार असून लवकरच त्यांचे वाटप केले जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No degree certificate after two years also
First published on: 06-02-2013 at 12:45 IST