पाणीकपातीचे संकट आणि दुष्काळामुळे शेतीच्या समस्या आ वासून उभ्या असतानाच मुंबईत मात्र त्याआधीच छत्रीविक्रेत्यांसमोर संकट उभे राहिले आहे. मुसळधार पावसात छत्रीशिवाय टिकाव लागणे कठीण असल्याने प्रत्येक मुंबईकर पावसात छत्री विकत घेतोच, मात्र पाऊसच नसल्याने छत्र्यांची दुकाने ओस पडली आहेत. रेनकोट आणि पावसाळी चप्पल विक्रेत्यांनाही या मंदीला सामोरे जावे लागत आहे.
पावसाची बेगमी म्हणून जूनच्या पहिल्याच आठवडय़ात लहानग्यांच्या शाळावस्तू खरेदीसोबत मोठय़ांचीही पाऊसखरेदी आटोपली जाते. छत्री आणि पावसाळी चपला, काही वेळा विंडचिटर व बॅगही घेतली जाते. बाकीच्या वस्तू वर्षांतून एकदा खरेदी केल्या जात असल्या तरी छत्रीची विक्री मात्र पावसाळाभर होत असते. याला जबाबदार म्हणजे मुंबईचा तुफान पाऊस, त्यात मोडणाऱ्या छत्र्या आणि लोकलमध्ये छत्री विसरून उतरण्याची प्रवाशांची सवय. त्यामुळे रेल्वे स्टेशनबाहेर छत्री विकणाऱ्यांना या काळात भरपूर नफा होतो. यंदाचा पावसाळा मात्र त्यासाठी अपवाद ठरलाय. जूनच्या पहिल्या आठवडय़ात ग्राहकांनी नेहमीप्रमाणे दणक्यात छत्रीखरेदी केली. त्यानंतर मात्र छत्रीविक्रीचे प्रमाण घसरले. गेल्या आठवडय़ापासूनच तर छत्रीच्या दुकानात कोणी फिरकेनासे झालेय.
दादर पश्चिमेच्या सदासर्वकाळ गर्दीचे चारचांद लागत असलेल्या दुकानातही मालक व विक्रेते गालावर हात ठेवून शांतपणे बसल्याचे दुर्मीळ चित्र दिसत आहे. अशाच एका दुकानात डोकावल्यावर गडबडीने उभ्या राहिलेल्या मालकाने सांगितले की, जूनच्या पहिल्या आठवडय़ात छत्रीविक्री झाली तेवढीच. मात्र छत्री मोडल्याने, हरवल्याने किंवा पाऊस सुरू होईपर्यंत छत्रीखरेदी पुढे ढकलल्याने येणारे ग्राहक फिरकलेच नाहीत. त्यातच महिनाअखेरचाही २०-३० टक्के वाटा आहे. पाऊस सुरू होईपर्यंत तरी सब शांती शांती असेल, असे त्यांचे म्हणणे होते.
रस्त्याकडेला दीडशेपासून चारशेपर्यंत परवडणाऱ्या छत्र्या विकणाऱ्या व तकलादू छत्र्या एका मुसळधार पावसात मोडल्याने पुन्हा ग्राहक मिळत असलेल्या विक्रेत्यांचे हाल तर अगदीच बेहाल झाले आहेत. थ्रीफोल्ड पासून लाकडाच्या दांडय़ापर्यंत अनेकविध डिझाइन्स असलेल्या आकर्षक छत्र्या खरेदी करण्यासाठी दरवर्षी झुंबड उडते मात्र आता या उरलेल्या छत्र्यांचे काय करायचे याची चिंता त्यांना भेडसावत असल्याचे विक्रेत्याने सांगितले. पाणीकपातीला तोंड द्यावे लागणारे नागरिकांप्रमाणे व शेतीसाठी ढगांकडे डोळे लावलेल्या शेतकऱ्यांप्रमाणे हे विक्रेतेही पावसाची आर्जवे करत आहेत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No rain in mumbai cause decrease in sale of umbrella
First published on: 28-06-2014 at 12:46 IST