सास-बहू मालिका असू देत नाहीतर रिअॅलिटी शोज असू देत. आजच्या घडीला टेलीव्हिजन हा ४० हजार कोटींची उलाढाल करणारा उद्योग आहे. तुलनेने चित्रपटसृष्टीची उलाढाल ही केवळ ११ हजार कोटींची आहे. त्यातही चित्रपटांच्या उपग्रह प्रक्षेपणाचा वाटा हा ९० टक्के आहे. शिवाय, चित्रपट आणि टीव्ही दोन्ही माध्यमांमध्ये कलाकार, तंत्रज्ञांची सहजपणे देवाणघेवाण होते आहे. आत्ताच्या घडीला तुमच्यासमोरचा पडदा किती मोठा आहे हा विचारच क्षुल्लक आहे. मोबाईल, एलसीडी, टॅब्लेट्सच्या जमान्यात छोटा पडदा-मोठा पडदा हा फरकच उरलेला नाही. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आर्थिक आणि सांस्कृतिक उलाढाल करणाऱ्या टीव्हीला ‘इडियट बॉक्स’ कसे म्हणता येईल?, असा उलटा सवाल करत टेलीव्हिजनच्या विश्वातील किमयागारांनी केला. ‘स्क्रीन बिग पिक्चर’च्या व्यासपीठावर जमलेल्या टेलीव्हिजन विश्वातील नामांकित मान्यवरांनी टीव्हीचे आता ‘टॅलेन्ट बॉक्स’ म्हणून स्थित्यंतर झाले असल्याचे आग्रही मत व्यक्त केले.
टीव्हीकडून चित्रपटांकडे वळलेला अभिनेता राजील खंडेलवाल, अमित साध, अभिनेत्री-निर्माती स्मृती इराणी, नौटंकी फिल्म्सचे सौरभ तिवारी, निर्माता राजन शाही आणि ‘स्टार प्लस’चे महाव्यपस्थापक नचिकेत पंतवैद्य यांनी ‘स्क्रीन बिग पिक्चर’ या कार्यक्रमात टेलीव्हिजन विश्वातील बदलता प्रवाह, त्यामागची कारणे अशा विविध गोष्टींचा लेखाजोखा मांडला. एक काळ असा होता की टेलीव्हिजनचे कलाकार म्हणून आम्हाला वेगळे ठेवले जायचे. टीव्हीचे कलाकार हे लोकांना जरूरीपेक्षा जास्त ओळखीचे होतात त्यामुळे चित्रपटात त्यांना तथाकथित ‘स्टार व्हॅल्यू’ मिळणे शक्य नसते, असा एक समज होता. त्यामुळे टीव्ही कलाकार इथपर्यंतच आमच्या अभिनयाच्या कक्षा मर्यादित केल्या जायच्या. आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आज मी निवडक चित्रपट करतो आहे. टीव्हीवर केवळ रिअॅलिटी शो करायचे असा निर्धार करूनही दोन्ही माध्यमांमध्ये सहजपणे नावलौकिक टिकवू शकतो, असा अनुभव राजीव खंडेलवालने सांगितला. तर राजीवचीच री ओढत ‘कायपोचे’ या चित्रपटातून हिंदीत आलेल्या अमित साधनेही चित्रपटसृष्टी आता आम्हाला कलाकार म्हणून वागवते. कोणीही हा टीव्हीचा कलाकार, चित्रपटातील कलाकार असा भेद करत नसल्यानेच दोन्ही माध्यमांमधील अंतर पुसट झाले असल्याचे सांगितले. तर ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ सारख्या मालिकेमुळेच एक अभिनेत्री म्हणून आपल्याला ओळख, प्रसिध्दी दिली तसंच आदरही दिला, असे स्मृती इराणीने सांगितले. चित्रपटांमध्ये काम करताना तुमची वैयक्तिक आयुष्य, तुमची शारिरीक स्थिती यांच्या मर्यादा येतात. मी सहा महिन्यांची गर्भवती असतानाही एका रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत होते. एक स्त्री आणि तिही गर्भवती म्हणून माझ्या निर्मात्यांनी मला कमी लेखले नाही की माझ्याबद्दल कधीच तक्रार केली नाही. हा आदर -आपलेपणा फक्त टीव्हीकडूनच मिळाल्याचे स्मृतीने सांगितले.
तर टीव्ही आता दूरदर्शनच्या दिवसांतला राहिलेला नाही, असे प्रतिपादन करतानाच नचिकेत पंतवैद्य यांनी टेलीव्हिजनच्या इतिहासातील दोन महत्त्वाच्या टप्प्यांचाही उल्लेख केला. १९९२ आणि २००० ही दोन वर्ष टीव्ही उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. १९९२ मध्ये केबलचे जाळे घरोघरी विस्तारले आणि २००० साली बॉलिवुडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन छोटय़ा पडद्यावर केबीसीसारखा शो घेऊन अवतरला. या दोन घटनांनी टेलीव्हिजनचा उद्योग पूर्णपणे बदलला, असे पंतवैद्य यांनी सांगितले. आजही टीव्ही कौटुंबिक नाटय़ांवरच्या मालिका आणि रिअॅलिटी शोजच्या भोवती घुटमळत असला तरी ३५० रूपयांचे तिकीट घेऊन चित्रपट पाहण्यापेक्षा केवळ शंभर रूपयात दिवसभर मालिका-शोज, अगदी नविन चित्रपटही घरबसल्या पहायला मिळत असल्याने टेलीव्हिनचा पसारा वाढतो आहे आणि तो वाढतच राहणार, असेही पंतवैद्य यांनी स्पष्ट केले. तर टीव्हीच्या वाढत्या महत्त्वामुळे कलाकार, तंत्रज्ञांप्रमाणेच टीव्ही निर्मात्यांनाही चांगले दिवस आल्याबद्दल राजन शाही आणि सौरभ तिवारी या दोघांनीही समाधान व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Aug 2013 रोजी प्रकाशित
टीव्ही आता ‘इडियट बॉक्स’ राहिलेला नाही!
सास-बहू मालिका असू देत नाहीतर रिअॅलिटी शोज असू देत. आजच्या घडीला टेलीव्हिजन हा ४० हजार कोटींची उलाढाल करणारा उद्योग आहे.
First published on: 04-08-2013 at 10:53 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now tv is not remain idiot box