पावणेचार कोटींच्या कर्जप्रकरणी फसवणूक केल्याबाबत आष्टी तालुक्यातील विविध सहकारी सोसायटय़ांच्या १६५ सभासदांविरुद्ध प्रशासकीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तीन पोलीस ठाण्यांमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली. गुन्हे दाखल झालेले अनेकजण अटक टाळण्यासाठी पसार झाले आहेत.
जिल्हा सहकारी बँकेकडून वीजपंप, पाईप, शेतातील शेड यासाठी मध्यम मुदतीचे एक ते चार लाखांचे कर्ज घेण्यासाठी बनावट कागदपत्रे, तसेच कर्ज न फेडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जिल्हा बँकेची विविध प्रकारे फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे प्रशासकीय मंडळाच्या चौकशीत समोर आली. आष्टी तालुक्यातील विविध सहकारी सोसायटय़ांच्या सभासदांनी मध्यम मुदतीचे कर्ज मोठय़ा प्रमाणात बँकेकडून घेतले. शेतात शेड उभारणे, वीजपंप, जलवाहिनी या साठी बनावट कागदपत्रे तयार करून एक ते चार लाख रुपयांपर्यंतचे कर्ज एका सभासदांने उचलले. तालुक्यातील १६५ सभासदांनी तब्बल पावणेचार कोटींचे कर्ज उचलले. मात्र, छदामही परत भरला नाही.
चौकशीत कर्ज प्रकरणात बनावट कागदपत्रे दाखल केल्याचे समोर आले. संबंधितांना कर्ज भरण्याबाबत नोटिसाही बजावल्या. मात्र, कोणी जुमानले नाही. अखेर बँकेला पावणेचार कोटींना फसविल्याप्रकरणी प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशावरून मंगळवारी आष्टी, कुंभेफळ, रुई, धामणगांव, सुलेमान देवळा, कडा येथील सोसायटय़ांच्या सभासदांविरुद्ध आष्टी, अंभोरा व अंमळनेर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. एकाच वेळी १६५ शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. प्रशासकीय मंडळाने गुन्हे दाखल केल्यामुळे आता या तालुक्यातील राजकारणही तापणार असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offence in 165 farmers
First published on: 14-08-2013 at 01:48 IST