देशातील सर्वात मोठी राज्य सहकारी बँक म्हणून नामांकित असलेल्या व अलीकडेच आपली शताब्दी पूर्ण केलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्याच्या शिखर बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रमोद कर्नाड यांची नियुक्ती राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाने नुकतीच केली.
प्रमोद कर्नाड गत २० महिन्यांपासून प्रभारी व्यवस्थेमधून व्यवस्थापकीय संचालक पदाचे कामकाज यशस्वीपणे पहात होते. त्यांची नियुक्ती संचालक मंडळाकडून ज्या वेळेस झाली, त्यावेळी बँकेचे नेटवर्थ ‘उणे’ होते व रिझव्‍‌र्ह बँकेकडून बँकिंग लायसन्स प्राप्त व्हावयाचे होते. याच कालावधीत बँकेचे संचालक मंडळ निष्कासित झाल्यामुळे काही संस्थांकडून ठेवीचे मुदतपूर्व विमोचन देखील सुरू झाले होते. अशा आव्हानात्म कपरिस्थितीत त्यांची प्रभारी व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली होती.
प्रशासन मंडळाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन राज्य बँकेस ३१ मार्च २०१२ अखेर २६६ कोटी रुपये संचित ढोबळ नफा तर १२५ कोटी रुपये निव्वळ नफा प्राप्त झाला.
तथापि मार्च २०१२ अखेर राहिलेला ७६ कोटींचा संचित तोटा दि.३० सप्टेंबर २०१२ रोजी पूर्णपणे भरून काढून राज्य बँकेस १८ कोटी रुपये निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. बँकेच्या प्रशासक मंडळाच्या अपेक्षेप्रमाणे प्रमोद कर्नाड बँकेचा व्यावसायिक आराखडा (बिझनेस प्लॅन) तयार करून बँकेस नवीन सुरक्षित कर्ज क्षेत्र देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
प्रमोद कर्नाड हे साहित्यिक असून त्यांच्या ४ कादंबऱ्या व १ कवितासंग्रह पुस्तक रूपाने प्रसिध्द झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद, भारतीय भाषा परिषद यांसह अनेक संस्थांचे पुरस्कारही त्यांच्या पुस्तकास लाभले आहेत. ‘एक होती आई’ या त्यांच्या कादंबरीचे कन्नड, गुजराथाी भाषेत अनुवादही झालेले आहेत.