तापमान चंद्रपुरात, नोंदींवरून संभ्रम
विदर्भात उष्णतेची लाट आली असून काल रविवारप्रमाणेच आज सोमवारीही राज्यात सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपुरात घेण्यात आली आहे. उष्णतेचा इतका पारा बघून लोक धास्तावले असून रस्ते अक्षरश: ओस पडले आहेत. दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेने शहरात पाहुणे येणे बंद झाले आहेत, तर वेदर सिटी या संकेतस्थळावर चंद्रपूरचे तापमान ४९ अंशापर्यंत दाखविण्यात आले आहे. त्यामुळे खरे तापमान कोणते, हा संभ्रम निर्माण झाला आहे.
एप्रिलला सुरुवात होताच सूर्याने आग ओकणे सुरू केले. गेल्या आठवडय़ात जेथे पावसामुळे वातावरण थंड व दमट होते तेथे शुक्रवारपासून पारा वाढायला सुरुवात झाली. शनिवारी ४३ अंश तापमानाची नोंद घेतल्यानंतर काल रविवारी अचानक उष्णतेची लाट आली असून पारा ४७.६ अंशावर गेला आहे, तर आज सोमवारीही भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर पारा ४७.६ अंश इतकाच दाखवित आहे, तर वेदर सिटी या संकेतस्थळावर तापमान तब्बल ४९ अंशापर्यंत गेल्याचे दाखविले आहे. काही संकेतस्थळांवर चंद्रपूरचे आजचे तापमान ४६ अंश दाखविले आहे. त्यामुळे नेमके खरे तापमान कोणते, हा संभ्रम निर्माण झाला आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासूनच उष्णतेने रंग दाखविण्यास सुरुवात केली. १ एप्रिलला जेथे ४०.८ अंश तापमानाची नोंद घेतली गेली तेथे ८ एप्रिलला ४३.२ अंशावर तापमानाचा पारा गेल्याने लोकांना उष्णतेचा त्रास होत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारी बारा वाजतापासूनच शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. निर्मनुष्य रस्त्यावर केवळ ऑटो व बसेस धावतांना दिसतात. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम शहरातील बाजारपेठेवर झालेला आहे. गोलबाजार, भाजीबाजार, मच्छी व मटन मार्केट काल रविवार असूनही निर्मनुष्यच होते. लग्नसराईचे दिवस असतांनाही दुपारी कापड बाजार अतिशय शांत दिसत आहे. याउलट, शीतपेयांची दुकाने सायंकाळी गर्दीने हाऊसफुल्ल आहेत. ऊसाचा रस, आईस्क्रीम पार्लर, कुल्फी व लस्सी सेंटर्सवर गर्दी आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणखी आग ओकायला लागेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. एकीकडे उन्ह वाढत असतांना ग्रामीण व शहरी भागात वीज व पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. शनिवारी दिवसभरातून चार ते पाच वेळा वीज व शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठाही खंडित झालेला होता. त्यामुळे लोकांना भर उन्हात पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे.
सध्या नागपूर व गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा सुरू आहे. सकाळ व दुपारी पेपर असलेल्या विद्यार्थ्यांना अतिशय उकाडय़ात पेपर सोडवावे लागत आहेत. बहुतांश महाविद्यालयात पंखे व कुलरची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची घामाने अक्षरश: आंघोळ होत आहे. रणरणत्या उन्हामुळे लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले असले तरी सायंकाळी शहरातील दोन्ही जलतरण तलाव हाऊसफुल्ल आहेत. हवामान खात्याने येत्या ७ जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा सामना विदर्भातील लोकांना करावा लागेल, असे म्हटले आहे.
यावर्षीचे तापमान ४७.६ पर्यंत गेल्याने शहरातील लोक अक्षरश: धास्तावले आहेत. त्यामुळे संचारबंदीसदृश्य दृश्य शहरात बघायला मिळत आहे. तापमानाची स्थिती अशीच राहिली तर मे मध्ये उन्हाची तीव्र दाहकता सहन करावी लागेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, ही दाहकता बघता शहरात पाहुणे येणे बंद झाले आहेत. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप बडकेलवार यांना विचारणा केली असता भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर दाखविलेले तापमानच खरे असल्याचे त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.