भारतीय उपखंडाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात दुर्दैवी घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान फाळणीवर आतापर्यंत अनेक चित्रपट आले आहेत. पण या सर्व चित्रपटांत अत्यंत दर्जेदार गणल्या गेलेल्या ‘गर्म हवा’ या १९७३ मधील चित्रपटाचे प्रदर्शन यंदा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात ‘इफ्फी’मध्ये करण्यात येणार आहे. त्यावेळी केवळ दहा लाखांत बनलेल्या या चित्रपटाचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचा खर्च आला असून या चित्रपटाच्या निगेटीव्ह प्रिंटवर खूप मोठी प्रक्रियाही करावी लागली आहे. मुंबईतील चित्रपट वितरक सुभाष छेडा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाची निगेटीव्ह प्रिंट अत्यंत खराब अवस्थेत होती. प्रिंटवर डाग, धूळ, ओरखडे, रंगांचे पॅच अशा अनेक गोष्टी होत्या. त्यानंतर अनेक ठिकाणी रंग पुसट झाले होते. मात्र ‘रुद्रा’ या डीव्हीडी कंपनीचे मालक सुभाष छेडा यांनी सथ्यु यांना या चित्रपटाच्या प्रिंटचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्या प्रिंटचा ताबा देण्याची विनंती केली. सथ्यु यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर छेडा यांनी आपले काम सुरू केले. हे काम तब्बल दोन वर्षे चालू होते. एखाद्या अत्युत्कृष्ट चित्रपटाचे पुनरुज्जीवन करणे हे खूप कठीण आणि गुंतागुंतीचे काम असते. लोकांना असे चित्रपट अथपासून इतिपर्यंत लक्षात असतात. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रिंटवर तब्बल एक वर्ष जगातील अत्युत्कृष्ट तंत्रज्ञ आणि कुशल तज्ज्ञ काम करीत होते. प्रिंटवरील छोटय़ा छोटय़ा अशा तब्बल दोन लाख फ्रेम्स त्यांनी काळजीपूर्वक तपासल्या. हे पुनरुज्जीवन आणि त्यानंतरची प्रक्रिया यासाठी तब्बल पाच लाख मनुष्य-तास काम चालू होते, अशी माहिती छेडा यांनी दिली. या सगळ्या प्रक्रियेनंतर सथ्यु यांना हा चित्रपट दाखवण्यात आला. सथ्यु यांनी या चित्रपटाच्या नव्या स्वरुपाला हिरवा कंदील दाखविला आहे. या सर्व प्रक्रियेला तब्बल एक कोटी रुपये खर्च आला. विशेष म्हणजे १९७३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी त्याचे निर्मितीमूल्य १० लाख एवढेच होते.    
गर्म हवा..
उर्दूतील ख्यातनाम लेखिका इस्मत चुगताई यांच्या लघुकथेवरून कैफी आझमी यांनी पटकथा लिहिलेल्या ‘गर्म हवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. एस. सथ्यु यांनी केले होते. बलराज सहानी, गीता सिद्धार्थ, फारूक शेख, ए. के. हंगल आणि जलाल आगा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आता संपूर्णपणे ताज्या स्वरुपात २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येईल. फाळणीच्या वेळी उत्तर भारतात राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. या चित्रपटाचा नायक (बलराज साहनी) पाकिस्तानात जावे की, भारतात राहावे, या द्विधा मनस्थितीत अडकला आहे, अशी या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट १९७४ मध्ये भारतातर्फे ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One croers expense for play the movie garm hava wich is worth of 10 lakhs
First published on: 20-11-2012 at 11:13 IST