कांद्याची भाववाढ सुरूच असून शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतिक्विंटलला तब्बल ६ हजार रुपये भाव मिळाल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. कांद्याच्या दरवाढीमुळे मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या मोठय़ा शहरात कांदा ७० ते १०० रुपये किलो दराने विकला जाण्याची शक्यता आहे.
येथील बाजार समितीत कांद्याला मिळालेला आजचा भाव उच्चांकी आहे. कांद्याची ६४८० क्विंटल इतकी आवक झाली. त्यात संवत्सरचे शेतकरी राजेंद्र शिवाजीराव आबक यांच्या १८ गोण्यांना, पंढरीनाथ देवकर यांच्या १० गोण्यांना व साई ट्रेडर्समध्ये आलेल्या एका शेतकऱ्याला प्रतिक्विंटलला ६ हजार रुपये भाव मिळाला.
क्रमांक १ च्या कांद्यास ४८०० ते ५५००, क्र. २ च्या कांद्यास ४३०० ते ४९००, गोटी कांद्यास ३००० ते ४८००, चिंगळी कांद्यास १५०० ते २००० या प्रमाणे भाव मिळाल्याची माहिती सभापती उत्तमराव औताडे व सचिव पी. बी. सिनगर यांनी दिली.
५०० किलो कांदा चोरीस
दोघांना अटक
तालुक्यात आंचलगाव शिवारातून माजी सरपंच रमेश फकीरा शिंदे यांच्या गट क्रमांक १२१ मधील कांदा चाळीतून ५०० किलो कांदा (८ गोण्या) दि. ७ रोजी चोरीस गेला होता. या प्रकरणी कोपरगाव पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी नाना युवराज मोरे व सुरेश दत्तू खुरसणे (रा. आंचलगाव, ता. कोपरगाव) यांना अटक करून त्यांच्याकडून दोन गोण्या कांदा जप्त केला, अशी माहिती पोलीस हे.कॉ. मोहनराव अनभुले यांनी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मधुकर औटे करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion reached to 6000 for 100 kg in kopargaon
First published on: 11-08-2013 at 01:52 IST