वैद्यकीय अभ्यासक्रमाचा कालावधी साडेसात वर्षांचा करण्याच्या इंडियन मेडिकल कौन्सिलच्या निर्णयास विरोध करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी मोर्चा काढला. या निर्णयामुळे वयाच्या ३५ वर्षांपर्यंत शिकत राहावे लागेल. परिणामी सामाजिक प्रश्न निर्माण होतील, अशी भीती या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांची कमतरता, तसेच डॉक्टरांची संख्या कमी असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासक्रमाचा कालावधी वाढविण्याचा निर्णय इंडियन मेडिकल कौन्सिलने घेतला. मात्र, अभ्यासक्रम कालावधी वाढविण्याच्या या निर्णयाची माहिती दिली जात नाही. ग्रामीण भागात काम करण्यास विरोध नाही. मात्र, अभ्यासक्रम कालावधीतच वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक द्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या पायल पेहरकर यांनी दिला. घाटी रुग्णालयातून निघालेल्या मोर्चात विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. तसेच नव्या निर्णयामुळे मानसिक छळ होत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.