महापालिका अंदाजपत्रकावर प्रदीर्घ काळ चर्चा करणाऱ्या परंतु त्यास मंजुरी देण्याआधीच सभागृहातून काढता पाय घेणाऱ्या सत्ताधारी व विरोधी पक्षातील बहुसंख्य नगरसेवकांनी या महत्त्वपूर्ण विषयात आपणांस किती रस आहे ते दर्शवून दिले आहे. अखेरच्या टप्प्यात सभागृहात १२७ पैकी केवळ २५ ते ३० नगरसेवक उपस्थित होते. जे उपस्थित होते, त्यांनी काहींनी भ्रमणध्वनी खेळण्यात वा गप्पांचा फड रंगविण्यात धन्यता मानली. पालिकेचे काही अधिकारी तर गाढ झोपले होते. यावरून पालिका प्रशासन व नगरसेवकांना अंदाजपत्रकाचे गांभीर्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या २०१४-१५ या वर्षांसाठीच्या २९६५ कोटी ६९ लाखाच्या अंदाजपत्रकास मंगळवारी सभागृहात मंजुरी देण्यात आली. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेत आगामी काळातील विकास योजना आणि त्या अनुषंगाने उपलब्ध होणारा निधी व खर्च याचे नियोजन करण्यात येते. या सभेला बहुतांश नगरसेवकांनी हजेरी लावली खरी, परंतु, अखेरच्या सत्रात म्हणजे आपली भाषणबाजी आटोपल्यावर त्यांनी घरी परतणे पसंत केले. आपले म्हणणे मांडल्यानंतर अखेरीस काय होईल, याची त्यांना भ्रांत नव्हती. इतकेच नव्हे तर, इतरांचे म्हणणे जाणून घेण्यातही रस नव्हता. परिणामी, अंदाजपत्रकास जेव्हा मान्यता मिळाली, तेव्हा सभागृहात जेमतेम २५ ते ३० सदस्यच उपस्थित होते. अंदाज पत्रकावरील चर्चेत अखेरच्या सत्रात विरोधी पक्ष नेते आणि सभागृह नेते आपले म्हणणे मांडत असताना सभागृह पुरते रिकामे झाल्याचे पाहावयास मिळाले. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे प्रत्येकी केवळ १० ते १५ नगरसेवक सभागृहात होते. आधीच बराच काळ चाललेल्या चर्चेने त्यांची काही ऐकण्याची मानसिकता नव्हती. यामुळे इतरांचे भाषण सुरू असताना काही भ्रमणध्वनीवर खेळ खेळण्यात मग्न होते. तर भाजप व मनसेच्या प्रमुख महिला नगरसेविका थेट मागील आसनांवर गप्पा मारण्यात दंग होत्या. काँग्रेस व इतर पक्षांच्या नगरसेवकांची वेगळी स्थिती नव्हती. निम्म्याहून अधिक नगरसेवक गायब तर उपस्थित गप्पाष्टकांमध्ये दंग असल्याने पालिका अधिकाऱ्यांनी चर्चेला फारसे महत्त्व दिले नाही. शहराच्या आरोग्याची धुरा सांभाळणारे अधिकारी चक्क निद्रादेवीच्या अधीन झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition seem to be non seriousness on municipal budget
First published on: 10-07-2014 at 02:35 IST