कोपरगावला राष्ट्रवादीचे वर्चस्व
नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीत विरोधकांच्या बहिष्कारामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व समित्यांवर बाजी मारली. विविध समित्यांच्या सभापतीपदी रविंद्र पाठक (सार्वजनिक बांधकाम), सुनिता जगदाळे (शिक्षण), नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी (आरोग्य व स्वच्छता), गणेश आढाव  (पाणीपुरवठा व जलनिस्सारण), शोभा पवार (महिला व बालकल्याण) यांची निवड झाली. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष मिनल खांबेकर या नियोजन व विकास समितीच्या पदसिध्द सभापती आहेत.  
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी त्यांना सहाय्य केले. राष्ट्रवादीने सत्ता मिळवल्यानंतर गेले वर्षभर विषय समित्यांच्या निवडी झाल्याच नव्हत्या. मात्र, आता शहराच्या विकासाला चालना मिळेल अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असे राष्ट्रवादीचे गटनेते राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
आमदार अशोक काळे यांच्या नेतृत्वाखालील जनविकास आघाडी व ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या लोकसेवा आघाडीचे पालिकेत समान संख्याबळ आहे. दोघांकडे तेरा नगरसेवक होते. पुरब कुदळे यांच्या निधनाने काळे गटाची एक जागा रिक्त झाली. आज निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काळे गटाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या कारभाराची गेल्या वर्षभराच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, वर्षभरात किती जनहिताची व विकासात्मक कामे केली हे जनतेसमोर मांडावे, अशी मागणी करीत पक्षप्रतोद डॉ. अजय गर्जे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र झावरे यांनी निवडीवर बहिष्कार घातला. त्यामुळे या निवडी बिनविरोध
झाल्या.
बिनविरोध निवडलेल्या समित्या पुढीलप्रमाणे-
सार्वजनिक बांधकाम समिती सदस्य- सिंधूबाई कडू, संगीता रुईकर, अलकाबाई लकारे, शिक्षण समिती- संगीता रुईकर, सिंधुबाई कडू, भारती वायखिंडे, आरोग्य व स्वच्छता- संगीता रुईकर, अलकाबाई लकारे, भारती वायखिंडे, पाणीपुरवठा- राजेंद्र सोनवणे, अलकाबाई लकारे, भारती वायखिंडे, नियोजन व विकास- सिंधूताई कडू, अलकाबाई लकारे, विजया देवकर, महिला व बालकल्याण- सिंधूबाई कडू, संगीता रुईकर, भारती वायखिंडे.