स्त्रीच्या आयुष्यात ‘आई’ होण्याचा क्षण हा अतीव आनंदाचा असतो. पण काही कारणांमुळे त्या स्त्रीला ‘मुदतपूर्व प्रसूती’ झाल्यास जन्माला येणारे मूल शारीरिक व मानसिक व्यंग घेऊन जन्माला येते किंवा अकाली मृत्युमुखी पडते. या दोन्ही गोष्टी ‘आई’ म्हणून त्या स्त्रीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठीही धक्कादायक असतात. हाच भावनांचा कल्लोळ चित्रांच्या माध्यमातून जे. जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारला आहे.   
‘इंडियन फाऊंडेशन फॉर प्रीमॅच्युअर बेबी’ आणि ‘जे. जे. कला महाविद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. रुची नानावटी यांच्या हस्ते तसेच महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे यांच्या उपस्थितीत झाले. या चित्रप्रदर्शनात ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी गर्भधारणा, जन्म, मुदतपूर्व जन्मलेल्या अर्भकांना ठेवण्यात येणारा अतिदक्षता विभाग, त्यातून बाहेर आणणे, रुग्णालयातून माता आणि बाळाला घरी पाठविणे आणि त्यानंतरचे जीवन आदी सात टप्प्यांमधील चित्रे काढली आहेत. या सर्व टप्प्यांवर स्त्रीची अवस्था कशी असते, हे या चित्रांतून साकारले आहे.
या प्रदर्शनात सागर कांबळे याच्या चित्राला ५१ हजार रुपयांचे प्रथम तर अमोल टकले व स्वप्निल रगडे यांना अनुक्रमे दुसरे (२१ हजार रु.) आणि तिसरे (११ हजार रु.) पारितोषिक मिळाले. आईच्या गर्भात बाळ असताना आईला त्याचा स्पर्श आणि हालचाल जाणवत असते. पण त्याला तेव्हा प्रत्यक्ष भेटता येत नाही. डॉक्टरांकडून आपले बाळ मुदतपूर्व जन्माला येणार आहे आणि जन्माला येणारे बाळ जगेल की नाही किंवा त्याला काही शारीरिक/मानसिक व्यंग नसेल ना, ते सुदृढ असेल का, अशा विचारांचा तिच्या मनात कल्लोळ माजतो. ही मन:स्थिती चित्रातून व्यक्त केली आहे, असे सागर कांबळे याने सांगितले; तर मुदतपूर्व प्रसूती झाल्यानंतर आईची मन:स्थिती आनंद आणि दु:ख अशी दोन्ही प्रकारची असते.
मूल जन्माला आल्यानंतर आई त्याला स्पर्श करते, पण हा आनंद फार काळ टिकत नाही. आपले बाळ बरे होऊन अतिदक्षता विभागाबाहेर येईल की नाही, अशी काळजी आईला असते. मी ही भावना चित्रातून व्यक्त केली आहे, असे अमोलने सांगितले.
याच कार्यक्रमात ३० विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांबाबत माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. नानावटी यांच्या हस्ते तर मुदतपूर्व प्रसूती या विषयावरील कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जयश्री मोंडकर व डॉ. सुधा राव यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. नंदकिशोर काब्रा, डॉ. शामकांत गिरी यांनी आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. हेच प्रदर्शन देशभरातील सात प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painting exhibition showing premature baby
First published on: 12-11-2014 at 05:21 IST