परभणी शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी आज सकाळी शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे व स्वच्छतेची पाहणी केली. अनेक भागात त्यांना अस्वच्छता दिसल्यामुळे आठ स्वच्छता निरीक्षकांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा सामान्य रुग्णालय व बसस्थानकाची त्यांनी पाहणी केली. सिंह यांच्या सूचनेनंतर जिल्हा रुग्णालयासमोरील अतिक्रमणे तातडीने काढण्यात आली.
तीन दिवसांपूर्वीच महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून श्री. सिंह यांनी सूत्रे स्वीकारली. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी त्यांनी पाऊले उचलली असून आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास श्री. सिंह हे उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकरसह शहराची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले.
उड्डाण पुलाखाली चालू असलेल्या देशी दारू दुकानाची श्री. सिंह यांनी पाहणी केली. त्यानंतर जिंतूर रोडने सरळ शासकीय दवाखान्यात धडक मारली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले अनुपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीवर यापूर्वीही प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. त्यांनी दवाखान्यातील सर्व विभागांची पाहणी केली. तसेच रुग्णालय परिसरात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकांची नोंदणी उपप्रादेशिक कार्यालयाकडे करण्यात आली आहे का? अशी विचारणा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. सामान्य रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते पायीच बाहेर पडले. रुग्णालयाच्या संरक्षण िभतीलगत झालेले अतिक्रमण तातडीने काढून घेण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना दिल्या व सायंकाळपर्यंत रुग्णालय अतिक्रमण मुक्त झाल्याचे चित्र शहरवासीयांना पाहावयास मिळाले.
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते रोशनखान मोहल्ला भागात पोहचले. त्या ठिकाणी जुनाट विहिरींची पाहणी केली. विहिरीमध्ये वापरलेले वैद्यकीय साहित्य त्यांना टाकल्याचे आढळले. काद्राबाद प्लॉटमध्ये ललीतकला भवनसमोरील मोठय़ा नालीची पाहणी केली. ही नाली कचऱ्याने तुडूंब भरल्याने नाराजी व्यक्त केली. सर्व स्वच्छता निरीक्षकांचा एक दिवसांचा पगार कपात करण्याची सूचना त्यांनी दिल्या. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनमालकाला तंबी दिली, तसेच त्यांनी बसस्थानकात पाहणी केली. तेथील कॅन्टीनमध्ये असलेल्या अस्वच्छतेबद्दल चालकाची चांगलीच खरडपट्टी त्यांनी काढली. कँटीनमध्ये वापरण्यात येणारे घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. सुलभ शौचालयात प्रवाशांकडून अधिक रक्कम घेत असल्याने त्यांना नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या. शंकरनगर, रामकृष्णनगर व कृषी विद्यापीठासमोरील भागाची त्यांनी पाहणी केली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भाजी विक्रेत्यांना नालीच्या पलीकडे जागा देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani district collector takes stern action on encroachments
First published on: 09-09-2013 at 01:57 IST