पुणे व िपपरी महापालिका यांच्यात मेट्रो खर्चाच्या वाटणीवरून तीव्र मतभेद असताना दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीत िपपरी हद्दीतून जाणाऱ्या खर्चातील वाटाच त्यांनी द्यावा, या िपपरी पालिकेच्या भूमिकेचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी समर्थन केले आहे.
दिल्लीत पवार व केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस िपपरीकडून महापौर मोहिनी लांडे, पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर राजू मिसाळ, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, समन्वयक बापू गायकवाड आदींची उपस्थिती होती. या वेळी झालेल्या चर्चेत पवार यांनी िपपरी पालिकेतील मेट्रोच्या स्थितीविषयी माहिती आयुक्तांना विचारली. तेव्हा खर्चाचा मुद्दा निघाला असता शहरातून जाणाऱ्या मेट्रोच्या खर्चाचा भार उचलण्याची भूमिका पालिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यास पुणे पालिका पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत समसमान खर्च करावा, अशी मागणी केली. त्यात हस्तक्षेप करत पवार यांनी िपपरी पालिकेच्या भूमिकेचे समर्थन
केले.
नाशिक फाटा येथे दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू असून तेथे मेट्रोसाठी काही अडचणी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, तेथे पाहणी झाली असून त्यावर मार्ग निघेल, असे सांगण्यात आले. या विषयीचा अहवाल दहा दिवसांत देण्याची सूचना आयुक्तांना करण्यात आली व त्यानंतर राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. शेवटी दिल्ली स्तरावर पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चिंचवडला उद्या अजितदादांची बैठक
चिंचवडच्या अ‍ॅटो क्लस्टर येथे शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक होणार आहे. प्रभागातील समस्या तसेच पालिकेतील प्रलंबित प्रश्नांवर या वेळी चर्चा होणार आहे. यापूर्वी, अशाच बैठकीत नगरसेवकांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्याऐवजी अजितदादांनी नगरसेवकांनाच सुनावले होते, असे सांगत शनिवारी होणाऱ्या बैठकीत त्याचीच पुनरावृत्ती होण्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.