पुणे येथील समृध्द जीवन फुडस् इंडिया लिमिटेड या कंपनीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक कोटी रूपयांची मागणी करून तडजोडीअंती ६५ लाख रूपये स्वीकारणाऱ्या चाळीसगाव ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
रवींद्र लांडगे यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात समृध्द जीवन फुडस् इंडिया या कंपनीविरोधात तक्रार दिली होती. ही कंपनी खरेदी-विक्रीचा कोणताही व्यवसाय करत नसून बचत स्वरूपात पैसा जमविण्याचा व्यवसाय करून लोकांची फसवणूक करत आहे. त्यासाठी सेबी, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद यांची परवानगी घेण्यात आलेली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी पोलीस नाईक बिपीन जगन्नाथ तिवारी यांनी एक कोटी रूपयांची मागणी केली. तडजोडीत ही रक्कम ६५ लाख करण्यात आली. मंगळवारी रात्री सव्वाआठ वाजता चाळीसगाव येथील जुन्या जकात नाक्यावरील मालेगावरोड पाँइटवर ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली. कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी करण्यात येत असेल तर ९१५८२४२४२४ किंवा ०२५३-२५७५६२८, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी केले आहे.