दिवाळी संपताच महानगरपालिका निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेदवार निश्चितीची घाई आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती व दोन्ही काँग्रेसची आघाडी याबाबत अजूनही ठोस स्वरूपाची कोणतीच कार्यवाही न झाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या पातळीवर मतदारयादीचे घोळ सुरूच असून सर्वानाच आता आचारसंहितेची प्रतीक्षा आहे.
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात मनपाच्या निवडणुकीची शक्यता व्यक्त होते. त्यादृष्टीने सर्व आघाडय़ांवर सध्या ही तयारी सुरू आहे. मनपाच्या सध्याच्या सभागृहाची मुदत दि. ३१ डिसेंबरला संपते. त्याआधी नवे सभागृह अस्तित्वात आणावे लागेल. येत्या काही दिवसांत आचारसंहिता जारी होऊन प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल.
भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन वातावरणनिर्मितीत आघाडी घेतली आहे, मात्र मित्रपक्ष शिवसेनेशी जागावाटपाची चर्चा अजूनही सुरूच झाली नाही. शिवसेनेतही येत्या एकदोन दिवसांतच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे समजते. दोन्ही काँग्रेसमध्ये मात्र अजूनही थंडच मामला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या दि. १०ला इच्छुकांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तके वितरित करण्यात येत आहेत.
राजकीय पक्षांची ही गडबड सुरू असतानाच प्रशासन आचारसंहितेच्या प्रतीक्षेत आहे. येत्या काही दिवसांत शहरात आचारसंहिता लागू होईल असे सांगण्यात येते. मात्र प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ झाले असून त्यावर गेल्या दि. ३० पर्यंत हरकती दाखल करून घेण्यात आल्या आहेत. या गोंधळामुळेच मोठय़ा संख्येने हरकती दाखल झाल्या असून, त्याचा निपटारा करणे हेच प्रशासनाच्या दृष्टीने जिकिरीचे काम ठरले आहे. विविध कारणांनी मतदारयादीतून वगळलेली नावे हीच प्रशासनासमोर मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ही नावे वगळल्याबाबत जिल्हा महसूल शाखेने कानावर हात ठेवले असून मनपा प्रशासन मात्र त्यांच्यावर ही जबाबदारी ढकलत आहे. या प्रक्रियेत अनेकांची नावे मोठय़ा संख्येने वगळण्यात आली असून, शहरात एकूण तब्बल ५३ हजार नावांचा त्यात समावेश आहे. याबाबतच मोठा संभ्रम असून त्याकडे इच्छुकांसह नावे वगळल्या गेलेल्या नागरिकांचे लक्ष आहे.