ऊर्जा बचतीच्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी महापालिकेतील अनेक वजनदार नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दबाव आणल्यामुळे या वादापासून दूर जाण्यासाठी एक उपायुक्त अखेर रजेवर गेले आहेत. फार मोठय़ा निधीची ही खरेदी असल्यामुळे अनेक नगरसेवकांनीही त्यात रस घेतल्याची चर्चा आहे.
ऊर्जा बचतीची चर्चा सध्या जोरात असल्यामुळे महापालिकेनेही ऊर्जा बचतीसाठी उपकरणे खरेदी करावीत असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार प्रस्ताव तयार करून या खरेदीसाठी निविदाही मागवण्यात आल्या. एकूणच ही खरेदी फार मोठय़ा रकमेची असल्यामुळे अनेक नेत्यांनी या खरेदी प्रक्रियेत लक्ष घातले आहे. काही नगरसेवकही या विषयात लक्ष घालत आहेत.
ही खरेदी करण्यापूर्वी ज्या कंपन्या ही उपकरणे पुरवण्यासाठी पुढे आल्या आहेत, त्यांच्या उपकरणांची तपासणी-चाचणी करावी आणि उपकरणे बसविल्यानंतर खरोखरच विजेची बचत होत आहे किंवा कसे ते पाहावे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, चाचणी करण्याची गरज नाही. खरेदी करून टाका, असा जोरदार आग्रह लोकप्रतिनिधींकडून धरला जात आहे. या आग्रहाला बळी न पडल्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांवर मोठा दबावही टाकण्यात आला असून या दबावामुळे एका उपायुक्तांनी अखेर रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही खरेदी केल्यानंतर विजेची बचत झाली, तरच पैसे द्यायचे असल्यामुळे चाचणी न करता उपकरणे खरेदी केली तर काय बिघडले, असा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. प्रशासन मात्र हा दावा मान्य करत नसल्यामुळे खरेदीबाबत चांगलाच पेच निर्माण झाला आहे.