सिन्नर तालुक्यात इंडिया बुल्सच्या रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांवर दबाव आणून विरोध करणाऱ्यांना कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेतले जात असून शेतकऱ्यांचा छळ तातडीने थांबवावा, या मागणीचे निवेदन शिवराज्य पक्षाच्या वतीने सिन्नरच्या नायब तहसीलदारांना देण्यात आले.
सिन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा इंडिया बुल्सच्या रेल्वेसाठी जमीन देण्यास विरोध आहे. शासन व इंडिया बुल्सतर्फे शेतकऱ्यांचे समाधान करण्याऐवजी पोलिसांची फौज उभी करून जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला जात आहे. शेतकऱ्यांना सातबारा विचारणे, प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेणे असे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार न थांबल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. संजय जाधव, लोकसभा संपर्क प्रमुख शाम खांडबहाले, दक्षता समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद तुंगार, महासचिव योगेश टर्ले, किशोर लांडे यांनी दिला आहे.