उमेदवारांमध्ये आता निकालाची धाकधूक असली तरी या निवडणुकीने सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची मात्र दिवाळीआधीच दिवाळी साजरी केल्याचे पाहावयास मिळाले. ऐन दिवाळीच्या उंबरठय़ावर निवडणूक आल्याने कार्यकर्त्यांसाठी अगदी मनाप्रमाणे झाले. निकालाचा दबाव कार्यकर्त्यांपेक्षा उमेदवारांवरच अधिक असल्याने या निवडणुकीने आपणांस काय दिले, याचीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये अधिक रंगली.
कोणतीही निवडणूक कोणत्याही बडय़ा उमेदवारास कार्यकर्त्यांच्या बळावरच लढवावी लागते. ज्याच्याकडे अधिक कार्यकर्ते त्याचा प्रचार मतदारसंघात सर्वदूर पोहोचण्यास मदत होते. प्रचाराप्रमाणेच मतदानाच्या दिवशीही कार्यकर्त्यांचे बळ पाठीशी असणे उमेदवारांसाठी अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळेच कार्यकर्त्यांना जपण्यासाटी आणि त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी उमेदवारांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परिणामी कार्यकर्त्यांची संख्याही वाढली. कार्यकर्त्यांचा भाव मोजता मोजता उमेदवारांची दमछाक झाली. तर, कार्यकर्त्यांची मात्र दिवाळी झाली. जेवणासह सर्व व्यावस्था, शिवाय मोबदला यामुळे कार्यकर्त्यांना ही निवडणूक फायदेशीर ठरली.
ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांसाठी दिवाळीचा जणूकाही ‘बोनस’ ठरली. दिवाळीतील संपूर्ण खर्च या निवडणुकीमुळे वरच्यावर भागविणे कार्यकर्त्यांना सहजशक्य होणार आहे.