सेट-नेटबाधित शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारला आलेल्या अपयशामुळे प्राध्यापकांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना घेराव घातला. एमफुक्टो आणि बुक्टू या प्राध्यापक संघटनेचे सुमारे १०० कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गिरगावच चौपटीजवळील सोमाणी महाविद्यालयात एका कार्यक्रमाकरिता टोपे आले होते. त्यावेळी, त्यांना गाडीबाहेर पडण्यास भाग पाडून प्राध्यापकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.
राज्यातील सेट-नेटबाधित शिक्षकांना नियमित करण्यात यावे, या विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या आदेशाला १४ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी त्याची सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. जून, २०१२ला आदेश काढून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, हे आश्वासन सरकारने अद्याप पूर्ण केलेले नाही.
प्राध्यापकांच्या प्रश्नांच्या भडिमाराला उत्तर देताना या संबंधात २७ नोव्हेंबरच्या कॅबिनेट बैठकीत चर्चा करू, असे आश्वासन टोपे यांनी दिले.