वाचकांची वृत्ती आणि वाचन संस्कृतीला चालना देणारा आठवा राष्ट्रीय पुस्तक मेळावा यावर्षीही कस्तुरचंद पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील पुस्तक प्रकाशन संस्था व विक्रेत्यांनी या मेळाव्यात गर्दी केलेली आहे.
दरवर्षीप्रमाणेच वर्षांचा पहिला शनिवार या मेळाव्यासाठी नागपूर महापालिका आणि नागपूर नॅशनल बुक फेअर यांनी निश्चित केला आहे. वर्षांची सुरुवातच या दोन्ही संस्थांनी बौद्धिक समृद्धता आणण्याच्या दृष्टीने केली आहे. २००७ पासून नागपूर महापालिका आणि नागपूर नॅशनल बुक फेअर या पुस्तक प्रकाशन व विक्रीसंबंधीच्या नऊ सहकाऱ्यांच्या संघटित प्रयत्नांतून दिवसेंदिवस या प्रदर्शनाचा नावलौकिक वाढत आहे. त्यावेळी केवळ २३ प्रकाशन संस्थांचे स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनात यावर्षी तब्बल १७० प्रकाशक, पुस्तक विक्रेत्यांचे स्टॉल्स लागले असून मराठी आणि इंग्रजीबरोबरच हिंदी आणि ऊर्दू प्रकाशक आणि विक्रेतेही या मेळाव्याकडे खेचले गेले आहेत. मराठीचे प्रकाशक व विक्रेते अपेक्षेप्रमाणेच जास्त आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड, नागपूरच्या प्रकाशकांनी एकापेक्षा जास्त स्टॉल निश्चित केले आहेत. एकूण ९० प्रकाशकांनी याठिकाणी हजेरी लावली असून १७० स्टॉल्स त्यांनी व्यापले आहेत.
मेळाव्याच्या लोकप्रियतेमुळे कोलकाता आणि दिल्लीपाठोपाठ नागपूरच्या पुस्तक मेळाव्याचे नाव घेतले जाते. त्यामुळेच दिवसेंदिवस स्टॉल्सचीही संख्या याठिकाणी वाढलेली दिसून येते. फेअरचे अध्यक्ष विनोद नांगिया आणि त्यांचे सहकारी गिरीश उहाळे, सुरेंद्र अंकोलेकर, नरेश सब्जीवाले, मधुसूदन बिंझाणी, दत्तू भालेराव, दीपक दुबे, विनोद लोकरे आणि सुनील तोडकर यांच्या सुपीक डोक्यातून पुस्तक प्रदर्शनाचा उपक्रम जन्मास आला. चांगल्या कामाला मुहूर्ताची गरज नसते तर केवळ इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते, हे कस्तुरचंद पार्कवरील पुस्तक प्रदर्शनाच्या आयोजनकर्त्यांनी दाखवून दिले आहे.
नागपूर महापालिका, पोलीस दल, अग्निशमन यंत्रणेचे सहकार्य दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी मेळाव्याला लाभले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात महापौर अनिल सोले यांनी या प्रदर्शनासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद केल्याचे गेल्या वर्षी सांगितले होते. याहीवर्षी त्यांचा वरदहस्त आयोजनकर्त्यांवर कायम आहे. महापौरांना वाचन संस्कृतीविषयी पोटतिडिक असून आजच्या उद्घाटन कार्यक्रमातही त्यांनी तसा पुनरुच्चार केला. उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी, तर वाचकांनीच ग्रंथ होऊन इतरांना प्रकाशमान केले पाहिजे, अशी लालित्यपूर्ण आवाहन करून वैदर्भीय बौद्धिक संस्कृतीला अधिक समृद्ध करण्याचे काम हे प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.