निवळी येथील विकास सहकारी साखर कारखान्याने अवघ्या ३१ दिवसांत उत्पादित केलेल्या १ लाख ११ हजार १११व्या पोत्याचे पूजन विशेष लेखापरीक्षक बी. एस. फासे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार वैजनाथ शिंदे होते. कारखाना हंगामात प्रतिदिन ४ हजार मेट्रिक टन, सहजीव प्रकल्पात १८ मेगावॉट वीजनिर्मिती व आसवनी प्रकल्पातून उत्पादन सुरू आहे. तोडणी, वाहतूक यंत्रणेतर्फे ऊसतोडणीसाठी ५ यंत्रांचा वापर सुरू आहे. या यंत्रांद्वारे प्रतिदिन ५०० मेट्रिक टन ऊसतोडणी केली जात आहे. ऊस वाहतुकीसाठी ३१ लहान ट्रॅक्टर गाडय़ांचा वापर सुरू आहे. चालू हंगामात आतापर्यंत १ लाख १८ हजार ३९० मेट्रिक टन गाळप, १ लाख ११ हजार १११ क्विंटल साखर उत्पादन, आसवनी प्रकल्पात ८ लाख ६८ हजार ६१२ लाख लीटर स्पिरीट उत्पादन झाले. सहवीजनिर्मिती प्रकल्पात ७२ लाख ५४ हजार ९०० युनिट वीजनिर्मिती झाली. यापैकी ४४ लाख ५४ हजार २८ युनिट विजेची महावितरणला विक्री करण्यात आली.  पाणीटंचाई पाहता कारखाना कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त उसाचे गाळप वेळेवर करण्यासाठी तांत्रिक कारणाने हा कारखाना बंद राहणार नाही, असे कार्यकारी संचालक एस. डी. बोखारे यांनी सांगितले. कार्यक्रमास विजय देशमुख, कार्यकारी संचालक एस. डी. बोखारे, कुसुम कदम, विमल पाटील आदी उपस्थित होते.